नायगाव जिल्हा निर्मितीसाठी मराठवाडा जनता परिषदेचा पुढाकार
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून व्यापक लढ्याचे नियोजन ; सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून नायगाव स्वतंत्र जिल्हा निर्मितीसाठी मराठवाडा जनता परिषदेने पुढाकार घेतला असून, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबरपासून या मागणीसाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या लढ्याला सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांना सोबत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर बैठकीचे पूर्वनियोजन करण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी नायगाव येथे खा. रवींद्र चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली. बैठकीत नायगाव जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी आंदोलनाची दिशा, सर्वपक्षीय सहभाग आणि पुढील कार्यक्रमांचे अतिशय सूक्ष्म नियोजन करण्यात आले. दि. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या व्यापक बैठकीसाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.बालाजी कोंपलवार यांनी दिली.
नांदेड जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असून, गेल्या ६५ वर्षांत जिल्ह्याचे विभाजन झालेले नाही. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयाशी संबंधित प्रशासकीय कामांसाठी मोठा प्रवास करावा लागतो. प्रशासन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी लहान जिल्ह्यांची निर्मिती गरजेची असल्याचे मत यापूर्वी अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नायगावची भौगोलिक आणि आर्थिक क्षमता लक्षात घेता स्वतंत्र जिल्ह्यासाठी हे ठिकाण सक्षम असल्याचे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले. नायगाव ही मोठी व्यापारी बाजारपेठ असून गोदावरी, मांजरा, लेंडी आणि मन्याड या चार नद्यांचा परिसराशी संबंध आहे. कृष्णूर येथील विशेष औद्योगिक क्षेत्रासह देगलूर, खानापूर येथील औद्योगिक वसाहती आणि बिलोली-मुखेड येथील प्रस्तावित औद्योगिक विकासामुळे या भागाला भविष्यात मोठ्या आर्थिक प्रगतीची संधी आहे.
नायगाव, बिलोली, देगलूर आणि मुखेड या चार तालुक्यांचे क्षेत्रफळ सुमारे २,७४० चौ.कि.मी. असून २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ७ लाख ६२ हजार ९४८ होती. सध्याची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा अधिक असल्याचा दावा बैठकीत करण्यात आला. नायगाव, बिलोली, देगलूर व मुखेड तालुक्यातील अनेक गावे जिल्हा मुख्यालयापासून ७५ ते ११० किलोमीटरपर्यंत दूर असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो.
याशिवायबोधन-बिलोली-नरसी-मुखेड-जळकोट-लातूर तसेच देगलूर-बिदर या प्रस्तावित रेल्वेमार्गांमुळे भविष्यात या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतंत्र नायगाव जिल्ह्याची मागणी ही केवळ प्रशासकीय सोयीपुरती मर्यादित नसून या संपूर्ण भागाच्या सर्वांगीण विकासाची गरज असल्याचा सूर बैठकीत उमटला.
या बैठकीस प्रा. डॉ. बालाजी कोंपलवार, नागोराव पाटील रोशनगावकर, ॲड.धोंडीबा पवार, जिल्हा बँकेचे संचालक श्रीनिवास चव्हाण, गोविंदराव पाटील सिंधीकर, प्रभाकर लख्खे, मोहन पाटील धुप्पेकर, निर्मलाताई धुप्पेकर, नायगाव शाखाध्यक्ष भाऊराव मोरे, सा.रा.जाधव, दत्ता मामा येवते, बाबूराव अडकिने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
१७ सप्टेंबरला नायगाव जिल्हा निर्मितीच्या लढ्याला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार करण्यात आल्याने आता सर्वपक्षीय एकजुटीतून नायगाव जिल्ह्याच्या मागणीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



