ताज्या बातम्यानांदेडनायगांव

संजय राऊतांनी वसंतरावांच्या ‘वसंतस्मृती’ला भेट देत दिवंगत खासदारांच्या स्मृतींना दिला उजाळा

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी, दि. १० सप्टेंबर रोजी रात्री नायगाव येथे भेट देत दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या ‘वसंतस्मृती’ स्थळाला भेट दिली. यावेळी वसंतराव चव्हाण यांच्या कार्याच्या आणि जुन्या आठवणींना उजाळा देत राऊत यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

नांदेड दौऱ्यावर आलेले खा. संजय राऊत यांनी रात्री नायगावला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत संपर्कप्रमुख बबनराव थोरात, भुजंग पाटील तसेच शिवसेनेचे नायगाव तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे उपस्थित होते. नायगाव येथे आगमन झाल्यानंतर खा. रवींद्र चव्हाण यांनी संजय राऊत यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना वसंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आणि आठवणींचा ठेवा असलेला स्मृतीग्रंथ भेट देण्यात आला.

यानंतर संजय राऊत यांनी ‘वसंतस्मृती’ मेमोरियलमध्ये जाऊन दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या जतन केलेल्या स्मृतींची पाहणी केली. वसंतराव चव्हाण यांच्याशी असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत राऊत यांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. काही काळ त्यांनी स्मृतीस्थळी थांबून वसंतरावांच्या आठवणींमध्ये रममाण होत आदरांजली अर्पण केली.

वसंतराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्याच्या स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत जपण्याचे काम ‘वसंतस्मृती’च्या माध्यमातून होत आहे. संजय राऊत यांच्या या अनपेक्षित आणि आपुलकीच्या भेटीमुळे चव्हाण कुटुंबीयांसह उपस्थित शिवसैनिकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणी जपणारी ही भेट नायगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

यावेळी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे जेष्ठ बंधू केशवराव चव्हाण, हनमंतराव चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, विजय चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बेळगे, नगरसेवक विठ्ठल बेळगे, माजी नगरसेवक पांडुरंग चव्हाण, संजय चव्हाण, माणिक चव्हाण, दत्ता मामा येवते, बालाजी शिंदे, समीर इफ्तेखार, साईनाथ चन्नावार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!