पितृपक्षात स्वामी संस्थेकडून ८५० कॅन्सरग्रस्त रुग्णांना शिधावाटप करण्याचा संकल्प

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): पितृपक्षाच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन ॲण्ड एन्वायर्नमेंट अर्थात ‘स्वामी’ (SWAMEE) या संस्थेच्या वतीने शिधावाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गेली २१ वर्षे सातत्याने हा उपक्रम सुरू आहे. यंदा पितृपक्ष रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ ते शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आहे.
या काळात दररोज ५० रुग्णांना, तर शेवटच्या सर्वपित्री अमावस्येला १५० रुग्णांना शिधा देण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण ८५० कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३ किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, पाव किलो खजूर, अर्धा किलो रवा, १०० ग्रॅम चहा पावडर,अर्धा किलो साखर,बिस्किटांचा पुडा आणि राजगिऱ्याची चिक्की देण्यात येणार आहे.
प्रत्येक रुग्णासाठी या उपक्रमाचा अंदाजे रुपये ५०० खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आर्थिक किंवा वस्तुरूप देणगी देऊन या सेवाकार्याला सहकार्य करण्याचे आवाहन ‘स्वामी’ परिवाराने केले आहे. प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देणगीदारांना संबंधित तिथीला स्वतः उपस्थित राहून अन्नदान करता येणार आहे.
‘स्वामी’ संस्थेचे कार्यालय परळ येथे आहे. कार्यालयाची वेळ सकाळी १० ते १२.३० व सायंकाळी ६ ते ८ वा. अशी आहे. याशिवाय एरव्ही दर शनिवारी मातृभाव अंतर्गत धान्यवाटप केले जाते. देणगीसाठी SWAMEE Social Workers Association या नावाने Bank of Baroda – Parel Branch येथील S/Account No. 99350100001251 या खात्यात रक्कम जमा करता येईल. IFSC Code : BARB0DBPARE आहे. संपर्क क्रमांक 8928061391, ई-मेल Swamee2016@gmail.com, संकेतस्थळ www.swamee_ngo.com आणि फेसबुक swameengo.com आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या या सेवाकार्यातून कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन्नधान्याचा आधार मिळत असून, देणगीदारांच्या सहकार्याने ही सेवा अधिक व्यापक करण्याचा ‘स्वामी’ परिवाराचा प्रयत्न आहे.



