ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अनुभवाला सलाम; योगदानाला कृतज्ञतेचा मान!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने समाजासाठी निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान-२०२६’ जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानातून ज्येष्ठांच्या सामाजिक योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.

‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान : वैयक्तिक’ अंतर्गत महिला विभागातून नवी मुंबई (रायगड) येथील वृषाली मगदुम आणि नांदेड येथील भागीरथी बच्चेवार यांची निवड करण्यात आली आहे. पुरुष विभागातून लातूर येथील प्रकाश घादगिने आणि ठाणे येथील बबन पाटणकर यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. दिव्यांग प्रवर्गातून पुणे येथील मानव कांबळे यांची सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.

‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ अंतर्गत सन्मानार्थी संघ म्हणून जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाची निवड करण्यात आली आहे. सन्मानार्थी संस्था म्हणून पुणे येथील जनसेवा फाउंडेशन यांची निवड झाली आहे.

सेवानिवृत्तीनंतर आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आजही निःस्वार्थपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सन्मानामागील प्रमुख उद्देश आहे. ज्येष्ठांच्या सामाजिक कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवण्याचाही या उपक्रमातून प्रयत्न केला जाणार आहे.

हा सन्मान सोहळा रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या सर्व सन्मानार्थींचे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!