आईचा निर्दयी खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप ; माळाकोळी पोलिसांच्या तपासाला न्यायालयीन यश

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : आईचा निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपी मुलाला न्यायालयाने जन्मठेप व द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली असून, या निकालामुळे माळाकोळी पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासाला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या सखोल तपासामुळे आणि न्यायालयात ठोस पुरावे सादर केल्याने गंभीर गुन्ह्यातील आरोपीला कायद्याची शिक्षा मिळाली आहे.
माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलवाडी शिवारात कौटुंबिक कारणावरून आरोपी नुर्सिंग बालाजी केंद्रे याने दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी आपल्या आईवर लोखंडी कत्तीने वार करून तिला गंभीर जखमी केले होते. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मृत महिलेचे पती बालाजी एकनाथराव केंद्रे यांच्या तक्रारीवरून माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय व तांत्रिक पुरावे, शस्त्र जप्ती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब तसेच अन्य वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुरावे प्रभावीपणे संकलित केले. हे सर्व पुरावे निर्धारित वेळेत न्यायालयात सादर करण्यात आल्याने न्यायालयाने त्यांची दखल घेत आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व दंड सुनावला.
गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांकडे विशेष लक्ष देण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने Trial Monitoring Cell कार्यरत करण्यात आली आहे. सरकारी पक्षाचे सहाय्यक सरकारी अभियोक्ता कागणे यांनी साक्षीदारांची प्रभावी तपासणी करून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे न्यायालयासमोर मांडले. या कामात पोलीस उपनिरीक्षक नाईम खान, पोहेकॉ. पारडे तसेच माळाकोळी पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
माळाकोळी पोलिसांच्या काटेकोर तपास, पुराव्यांचे शास्त्रशुद्ध संकलन आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्यामुळे गंभीर खुनाच्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळाल्याने पोलीस दलाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा निकाल गंभीर गुन्हे करणाऱ्यांसाठी कायद्याचा धाक निर्माण करणारा ठरणार आहे.



