कुंडलवाडीतील निकृष्ट रस्ता व नाली बांधकामाची चौकशी करा: सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गट्टुवार यांची मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत सुरू असलेल्या सी.सी. रस्ता व नाली बांधकामासह पाण्याच्या टाकी ते दस्तगीर चौक या रस्त्याच्या कामामध्ये नगरसेवकांचा हस्तक्षेप होत असून, त्यामुळे कामाचा दर्जा खालावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गंगाधर धर्मपुरी गड्डमवार यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद कुंडलवाडी व जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, नगर परिषदेमार्फत शहरातील मुख्य बाजारपेठेतील सी.सी. रस्ता व नाली बांधकाम तसेच पाण्याच्या टाकीपासून दस्तगीर चौकापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र ही दोन्ही विकासकामे मंजूर अंदाजपत्रक, आराखडा आणि शासनाने निश्चित केलेल्या तांत्रिक निकषांनुसार होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
निवेदनात विशेषतः नमूद करण्यात आले आहे की, स्थानिक नगरसेवक विकास कामांमध्ये हस्तक्षेप करून दर्जाहीन कामे केली जात असल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे .विकासकामांमध्ये लोकप्रतिनिधींच्या अशा हस्तक्षेपामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.याशिवाय, कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
अशा प्रकारच्या दर्जाहीन कामांमुळे भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर शासनाच्या तज्ज्ञ तांत्रिक समितीमार्फत संपूर्ण कामाची स्वतंत्र तपासणी करण्यात यावी, मुख्य बाजारपेठेतील सी.सी. रस्ता व नाली बांधकाम तसेच पाण्याच्या टाकी ते दस्तगीर चौक या रस्त्याच्या कामांची तांत्रिक तपासणी करून मंजूर आराखडा, अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांनुसार काम झाले आहे की नाही याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच चौकशीदरम्यान निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे अथवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित कंत्राटदार, जबाबदार अधिकारी, संबंधित नगरसेवक आणि इतर दोषींवर प्रचलित नियमांनुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित विकासकामे तात्पुरती स्थगित ठेवावीत, तसेच शासनाच्या निधीचा गैरवापर करून निकृष्ट दर्जाची बांधकामे करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शासनाच्या निधीतून होत असलेल्या विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि तांत्रिक निकषांचे पालन होणे अत्यावश्यक असल्याने प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गट्टुवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.



