ताज्या बातम्यानांदेडनायगांव

दोन वर्षांपासून अर्धवट रस्ता; रस्त्याच्या खड्ड्यांत बेशरमाची झाडे लावून देगावकरांनी प्रशासनाचा केला निषेध

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : नांदेड महामार्ग ते देगाव या जोडरस्त्याची अवस्था आज अक्षरशः दयनीय बनली आहे. तब्बल दोन वर्षांपासून हा रस्ता अर्धवट अवस्थेत पडून असून, त्यावरील खड्डे इतके भीषण झाले आहेत की “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. मात्र एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही स्थानिक आमदार, सार्वजनिक बांधकाम विभागलाही जाग येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी देगावच्या नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून अनोखे आंदोलन केले. हा निषेध म्हणजे प्रशासनाच्या बेशरम कारभारालाच आरसा दाखवणारा असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या रस्त्याबाबत उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव यांच्याकडे अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आली, तक्रारी करण्यात आल्या, पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांची खैरात मिळाली; प्रत्यक्षात एकही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे.

रस्त्यावरील खोल खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अचानक दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्या असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरीही संबंधित यंत्रणा ढिम्म असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काम सुरू न केल्यास गावातील नागरिक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन आणि उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. गावातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गावात नसल्यामुळे रस्ता, पाणी, स्वच्छता यांसारखे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झोपेत, नागरिक मात्र खड्ड्यांत!” अशी भावना आता देगावकरांमध्ये तीव्र झाली असून, एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker