कुंडलवाडी पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर शेतकरी आत्माराम देगावे यांचे उपोषण मागे

कुंडलवाडी :- दौलापूर येथील शेतकऱ्याचे २ लाख ७० हजार रुपये लुटमार प्रकरणात कुंडलवाडी पोलिसांकडून ३ आरोपींना अटक करून ८० हजार रुपये शेतकऱ्यास परत दिले.पण उर्वरित १ लाख ९० हजार रुपये आरोपींकडून वसूल करून देण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांनी दि.१० जुलै रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. आज दि.१० जुलै रोजी कुंडलवाडी पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अजून अटक करून उर्वरित मुद्देमाल हस्तगत करू असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते शेतकरी आत्माराम देगावे यांनी उपोषण मागे घेतले आहे.
कुंडलवाडी येथील बँक ऑफ बडोदा मधून दौलापुर येथील शेतकरी आत्माराम देगावे यांनी २ लाख ७० हजार रुपये उचलून मोटारसायकल वरून जात असताना बसस्थानक जवळील महालक्ष्मी मंदिराजवळ पाठीमागून मोटारसायकल वर येऊन २ लाख ७० हजार रुपयांची लुटमार केल्याची घटना दि.२२ आँक्टोंबर २०२४ रोजी घडली होती. या प्रकरणात तीन आरोपींना कुंडलवाडी पोलीसांनी अटक करून ८० हजार नगदी व ८० हजार किमतीची एक मोटारसायकल असा एकुण १ लाख ६० हजार रूपये रिकवरी केली होती. यालुटमार प्रकरणातील १ लाख ९० हजार रुपये परत मिळावेत.
यासाठी फिर्यादी शेतकरी आत्माराम देगावे यांनी दि.१० जुलै रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याकडे दिला होता. त्यानुसार आज १० जुलै रोजी उपोषणकर्ते आत्माराम देगावे यांना कुंडलवाडी पोलिसांकडून या प्रकरणात आरोपींना अटक करून उर्वरित मुद्देमाल हस्तगत करू असे लेखी आश्वासन दिले.त्यामुळे उपोषणकर्ते आत्माराम देगावे यांनी उपोषण मागे घेतले आहे.
लुटमार प्रकरणातील उर्वरित रक्कम १ लाख ९० हजार रुपये कुंडलवाडी पोलिसांनी परत न दिल्यास एक महिन्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू असे शेतकरी आत्माराम देगावे यांनी सांगितले आहे.
शेतकरी लुटमार प्रकरणातील तीन आरोपींना पुन्हा तपासासाठी अटक करून उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी आत्माराम देगावे यांना कुंडलवाडी पोलीसांकडून लेखी आश्वासन दिल्याने त्यांचे समाधान झाल्याने शेतकरी देगावे यांनी दि.१० जुलै रोजी चे उपोषण मागे घेतले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले.



