ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

समृद्ध राष्ट्रासाठी सर्वांनी निःस्वार्थपणे काम करण्याची गरज राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन

नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालयात भव्य सत्कार सोहळा

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- आपले जीवन राष्ट्र आणि समाजाला समर्पित असले पाहिजे, समाज सुशिक्षित झाला पाहिजे,समृद्ध राष्ट्रासाठी सर्वांनी निःस्वार्थपणे उसंत न घेता अधिक वेगाने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात आयोजित सत्कार सोहळ्यात केले.

येथील अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात सोमवारी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, खा.अजित गोपछडे, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, सचिव वनिता जोशी, प्राचार्य एम.वाय.कुलकर्णी, उपप्राचार्या कल्पना कदम आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत जनसंघात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रासाठी समर्पित भावनेनने काम केले. माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाल उपाध्याय प्रभृतींनी कधी पायी तर कधी सायकलवरून प्रवास करून प्रचार केला. प्रचारकांना विरोधक टोमणे मारायचे, हिनवायचे,तरीही अनेक अडचणींचा सामना करत ही माणसे आपल्या विचारांवर ठाम होती, तत्वाशी कुठलीही तडजोड न करता, स्वतःचा, परिवाराचा विचार न करता आपले संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले. त्यांचे नैतिक्य मुल्य, प्रामाणिकपणा, कष्टाचे, परिश्रमाचे आणि चिकाटीचे फळ आज आपल्याला मिळाले आहे.

यावेळी राज्यपालांनी माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत 6 डिसेंबर 1992 मध्ये अयोध्येतील घटनाक्रम सांगितला.
विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, शैक्षणिक धोरणात अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, आपल्या देशात भास्कराचार्य, भारद्वाज यांच्यासारखे अनेक विद्वान पंडीत होऊन गेले, त्यांची संशोधनात्मक पुस्तके वाचली पाहिजेत, असेही आवाहन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करून राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संवैधानिक जबाबदारी सांभाळतानाच मराठवाड्याच्या विकासाला गती देण्याचे मोलाचे काम केल्याचे सांगून त्यांच्या कारकिर्दीची प्रशंसा केली. खा.अजित गोपछडे, संस्था अध्यक्ष बालासाहेब पांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी महाविद्यालयाच्यावतीने राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker