पत्रकारावर खंडणीचा गुन्हा नोंद करणारी वादग्रस्त महिला तांत्रिक सहायक एसीबीच्या जाळ्यात
प्रकाश महिपाळे
नांदेड : धर्माबाद पंचायत समितीच्या वादग्रस्त कंत्राटी तांत्रिक सहायक प्रियंका किशनराव लोहगावकर हिस ६ हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले असल्याने खळबळ उडाली असून. सदर महिलेने तीन दिवसापूर्वी एका पत्रकाराच्या विरोधात खंडणी व विनयभंगाचा गुन्हा नोंद केला होता. तीनच दिवसात खोटेपणाचे बिंग फुटल्याने तो पत्रकार निर्दोष असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
धर्माबाद पंचायत समितीचे वादग्रस्त महिला तांत्रिक सहायक प्रियंका लोहगावकर व तिचा पती मकरंद काळेवार या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या घटनेमुळे धर्माबाद तालुक्यात नवीन चर्चेला तोंड फुटले असून पत्रकार माधव हनमंते यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटाच असल्याचे बोलल्या जात आहे.
एसीबीच्या सापळ्यात अडकलेल्या लोहगावकर हिने धर्माबाद येथील पत्रकार माधव हनमंते यांच्यावर तीन दिवसापूर्वी विनयभंग व खंडणीचा गुन्हा नोंद करुन मी प्रामाणिक असल्याचा देखावा निर्माण केला होता. पण तीनच दिवसात बेगडी प्रामाणिकपणाचा फुगा फुटला आणि प्रियंका लोहगावकर हि सापळ्यात अडकली.
हनमंते यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्या प्रकाराची तालुकाभर चर्चा सुरुच असताना या प्रकरणातील फिर्यादी लाचखोरीच्या प्रकरणात आरोपी झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पाटोदा (बु.) ता. धर्माबाद, जि.नांदेड येथे गट क्र. 444 मध्ये एक एकर शेतीमध्ये त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अहिल्याबाई सिंचन विहीर योजने अंतर्गत विहीर मंजूरीचा प्रस्ताव दि. 08/01/2024 रोजी पंचायत समिती धर्माबाद येथे दाखल केला होता. सहायक कार्यक्रम अधिकारी, पंचायत समिती, धर्माबाद यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवून टिपणी तयार करून तांत्रिक सहायक श्रीमती प्रियंका लोहगावकर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी दिली.
तक्रारदार यांनी तांत्रिक सहायक श्रीमती प्रियंका लोहगावकर यांचे कडे सिंचन विहीरीचे कामासंबंधाने चौकशी करण्यासाठी गेले असता, तांत्रिक सहायक श्रीमती प्रियंका लोहगावकर यांनी तक्रारदार यांना 8 हजाराची मागणी केली. सदरची 8 हजाराची रक्कम ही लाच असल्याचे तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली. दि. 07/03/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता, आरोपी लोकसेवक तांत्रिक सहायक श्रीमती प्रियंका लोहगावकर यांनी पंचासमक्ष 8 हजाराची मागणी करून तडजोडीअंती 6 हजार रूपये स्विकारण्याचे मान्य केले.
त्यावरून तांत्रिक सहायक श्रीमती प्रियंका लोहगावकर यांनी पंचायत समिती कार्यालय, धर्माबाद, ता. धर्माबाद, जि. नांदेड येथे पंचासमक्ष 6 हजारलाच स्विकारून त्यांचे पती मकरंद काळेवार यांच्या कडे दिले. ला. प्र. वि., नांदेड पथकाने सदरची लाच रक्कम 6 हजार त्यांचे पती मकरंद काळेवार यांच्याकडून पंचासमक्ष जप्त केली. आलोसे चे पती खाजगी इसम यांनी लाचेची रक्कम आलोसे यांच्याकडून स्विकारून लाच घेण्यास प्रोत्साहन दिले. आरोपी लोकसेवक प्रियंका लोहगावकर, तांत्रिक सहायक व त्यांचे पती मकरंद काळेवार यांना ताब्यात घेण्यात आले असुन पो.स्टे. धर्माबाद, ता.धर्माबाद, जि. नांदेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.