नरसी सोसायटीवर पुन्हा प्रशासक : सहाय्यक निबंधकांना आपणच दिलेला निर्णय फिरवावा लागला

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : आ.राजेश पवार यांनी जिल्हा उपनिबंधकाला दम दिल्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे सहाय्यक निबंधकांना आपणच दिलेला नरसी सोसायटीचा निर्णय फिरवावा लागला. अशासकीय सदस्यांचे प्रशासकीय मंडळ बरखास्त करुन सोसायटीचा कारभार पुन्हा प्रशासकाच्या हाती द्यावा लागला. शहकाटशहाच्या राजकारणातून नाट्यमय घडामोडी घडल्या असल्या तरी आ. राजेश पवारांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या दमबाजीची सोमवारी दिवसभर चर्चा होती.
नरसी सेवा सहकारी सोसायटीचा नेत्यांनी राजकीय आखाडा करुन टाकला असून आपले वर्चस्व अबाधित राहण्यासाठी जे करता येईल ते करण्यात येत आहे. गावपातळीवरील एखाद्या सोसायटीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात शहकाटशहाचे राजकारण पहील्यांदाच होताना दिसत असून. या सोसायटीसाठी एका आमादाराने तर जिल्हा उपनिबंधकाच्या कुळाचा उद्धार केल्याची आँडीओ क्लिप सकाळपासून समाजमाध्यातून फिरत आहे. त्यामुळे धरसी सेवा सहकारी सोसायटी बाबत काय निर्णय होतो याची तालुक्यातील नागरिकांना मोठी उत्सूकता होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी घुमजाव करत निर्णय घेतला आहे.
कुणाकडेही बहूमत नसल्याने नरसी सेवा सहकारी सोसायटीच्या पदाधिकारी निवडीच्या ता.५ जुन रोजी होवू शकल्या नाहीत त्यामुळे सभा रद्द करण्यात आली त्यानंतर पुन्हा एकदा नवनिर्वाचित सदस्यांची सभा (ता.२३) जुन रोजी बोलवण्यात आली पण संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या कोरम अभावी निवडी होवू शकल्या नाहीत. दोन वेळा बोलावण्यात आलेल्या सभेला कोरम पुर्ण होवू शकला नाही. परिणामी नरसी सेवा सहकारी सोसायटीवर नरसी येथील जिल्हा बँकेचे शाखाधिकारी के.एन. राऊत यांची ता.३० जुन रोजी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर भाजप नेते श्रावण भिलवंडे यांनी अशासकीय सदस्यांची प्रशासकीय समिती नियुक्त करण्याची मागणी सहकार राज्यमंत्र्याकडे केली होती. सहकार राज्यमंत्र्याच्या पत्राचख संदर्भ देत जिल्हा उपनिबंधकांनी नरसी सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासकीय समिती नियुक्त करण्याचे निर्देशित दिले. त्यानुसार ता.४ जुलै रोजी नायगावचे सहायक निबंधक जी.आर. कौरवार यांनी तीन सदस्यांच्या प्रशासकीय समिती नियुक्तीचे आदेश काढले असून यात सोसायटीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष गजानन पांडुरंग भिलवंडे, तर सदस्य म्हणून शंकर विश्वनाथ कोकणे व वसंत शरणप्पा कस्तूरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
तीन सदस्यांच्या प्राधिकृत समितीमुळे पुन्हा वादाला तोंड फुटले. दुसरा गट थेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दरबारात गेला. त्यातच आ. राजेश पवारांनीही सदरील समिती रद्द करुन पुन्हा प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. आ. पवार यांच्या पत्रावर सहकार मंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधकांनी योग्य तो निर्णय घ्यावा असा शेरा (ता.११) जुलै रोजी मारला. त्यानंतर तीन सदस्यांची समिती रद्द करुन पुन्हा प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी जिल्हा उपनिबंधकावर राजकीय दबाव वाढला होता. त्यामुळे नायगावचे सहायक निबंधक जी.आर. कौरवार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७७ अ (४) मधील तरतुदीनुसार सेवा सहकारी संस्था नरसी, ता. नायगाव, जि. नांदेड या संस्थेवर नियुक्त केलेल्या (१ ते ३) गजानन पांडुरंग निलवंडे, शंकर विश्वनाथ कोकणे आणि वसंत शरणप्पा कस्तुरे यांच्या प्राधिकृत समिती ऐवजी एन.के.राऊत, शाखाधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नरसी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणुन नियुक्ती करीत आहे असे आदेश १४ जुलै रोजी काढले.
नायगावच्या सहायक निबंधकांनी काढलेल्या आदेशामुळे दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केलेल्या नरसी सोसायटीच्या युध्दात भास्कर भिलवंडे, संभाजी भिलवंडे, रवींद्र भिलवंडे व माणिक लोहगावे यांच्या गटाने बाजी मारली आहे.
नरसी सोसायटीचा विषय स्थानिक नेत्यांनी तर प्रतिष्ठेचा केलाच होता पण आ. राजेश पवार यांनीही आपल्या राजकीय विरोधकाला शह देण्यासाठी सोसायटीच्या राजकारणात इंट्री केली आणि रविवारी जिल्हा उपनिबंधकांना अश्लील व शिवराळ भाषेत शिविगाळ केल्याची आँडीओ क्लिप समाजमाध्यातून व्हायरल झाली. यावर ग्रामीण भागातील नागरिकांनी आतिशय तिव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.