धर्माबादच्या चिकना फाट्यावर एस.टी. बसचा अपघात – दोन गंभीर जखमी, कारचालक फरार

New Bharat Times नेटवर्क
धर्माबाद: – धर्माबाद तालुक्यातील चिकना फाटा सकाळी 08:30 वाजता बस क्र.MH20BL3521 या क्रमांकाच्या एस.टी. बसचा भीषण अपघात घडला. समोरून येणाऱ्या कारचा वेग अधिक असल्याने आणि दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बसमध्ये एकूण आठ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर सौम्य जखमींवर धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघाताच्या वेळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी हा अपघात कारचालकाच्या चुकीमुळे झाल्याचे सांगितले आहे. अपघात होताच संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले असून, पुढील तपास धर्माबाद पोलीस करत आहेत.



