ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडीत चांगल्या रस्त्यावर पुन्हा कोट्यवधींचा खर्च ; नागरिक आक्रमक!

नगर परिषदेच्या रस्ता कामाला तीव्र विरोध ; काम तात्काळ थांबवण्याची निवेदनाद्वारे मागणी

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी : कुंडलवाडी नगर परिषद प्रशासनाच्या मनमानी आणि नियोजित कामांविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पेठ भागातील दस्तगीर चौक ते पाण्याची टाकी आणि धर्माबाद रोडवरील श्री व्यंकटेश्वर कमानीपर्यंतच्या सुस्थितीतील सी.सी. रस्त्यावर पुन्हा कोट्यवधी रुपयांचा निधी उधळला जात असल्याचा गंभीर आरोप करत, नागरिकांनी या कामाला जोरदार विरोध दर्शवला आहे. साहेबराव लक्ष्मणराव कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना कायदेशीर निवेदन देऊन काम तात्काळ थांबवण्याची व चौकशीची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या १० ते १५ वर्षांत याच रस्त्याचे दोनदा सी.सी. बांधकाम झाले आहे. सध्याचा रस्ता पूर्णपणे सुस्थितीत व गुळगुळीत असताना केवळ किरकोळ खड्ड्यांचे कारण देऊन नवीन रस्ता तयार केला जात आहे.

सततच्या रस्ता बांधकामामुळे रस्त्याची पातळी आधीच उंचावली आहे. आता पुन्हा त्यावर रस्ता बनवल्याने आजूबाजूची निवासी घरे रस्त्यापेक्षा खाली गेली आहेत. यामुळे पावसाळ्यात आणि नाल्यांचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान होण्याची आणि जीवित व वित्ताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या:

अंदाजपत्रक जाहीर करा: रस्ता कामाचे मंजूर अंदाजपत्रक आणि निविदा तपशील तातडीने सार्वजनिक करण्यात यावेत. तांत्रिक अहवाल सादर करा: जुना रस्ता चांगला असताना नवीन बांधकामाची आवश्यकता स्पष्ट करणारा तांत्रिक अहवाल सादर करावा. पाणी निचरा आराखडा: घरांच्या पातळीचा विचार करून पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचा सर्वंकष आराखडा तयार केल्याशिवाय पुढील काम सुरू करू नये. गुणवत्ता तपासणी: कामाच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात यावी.

नागरिकांशी चर्चा न करता किंवा त्यांच्या समस्यांचे निवारण न करता काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाल्यास, नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, नांदेड आणि विभागीय आयुक्त (नगर विकास) यांनाही पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर साहेबराव कोंडावार, बालाजी वाघमारे, वहाब शेख, हणमलू वडेन्ना गट्टुवार, प्रकाश कोंडावार, लक्ष्मण रघुपतीवार, श्रीनिवास नारायण गट्टूवार, संदीप नरावाड, सचिन मानेलू, नवीन हामंद, दत्ता कापकर, हणमलू सटवाजी गट्टुवार, नवीन दमन्ना गट्टुवार, हणमलू कोनेरवार, बालाजी कोनेरवार, सोमेश ठक्कुरवार, मोगलाजी कुमरवार, सुनील झंपलकर, सयाराम नामतेष, गंगाप्रसाद गंगोणे, श्रीनिवास जिठ्ठावार, लक्ष्मण गंगोणे, पिराजी यरमुलवार, गंगाधर धर्मपुरी गट्टुवार यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!