ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दिलीप पाटील यांच्या ‘काळ आणि माणूस’ तसेच ‘पाथवे पोएम्स’ या पुस्तकांच्या प्रकाशनाने रंगला साहित्याचा संस्मरणीय सोहळा

मुंबई (मिलिंद मिरजकर) : ज्येष्ठ साहित्यिक दिलीप पाटील यांच्या ‘काळ आणि माणूस (बदलत्या समाजाचे चिंतन)’ तसेच ‘पाथवे पोएम्स – जेंटल इंग्लिश व्हर्सेस फॉर क्वायट पाथवेज ऑफ लाइफ’ या इंग्रजी कवितासंग्रहाच्या प्रकाशनाचा सोहळा, अभिवाचन आणि साहित्यचर्चा रविवारी सायंकाळी दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. साहित्य, रंगभूमी, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एका दर्जेदार साहित्य संमेलनाचे स्वरूप लाभले. कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन सतीश सोळांकूरकर यांनी केले. प्रारंभी दिलीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या साहित्यप्रवासाचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ रंगकर्मी व साहित्यिक नारायण जाधव आणि ज्येष्ठ साहित्यिक नारायण लाळे यांच्या हस्ते दोन्ही साहित्यकृतींचे प्रकाशन करण्यात आले.

प्रकाशनानंतर नारायण जाधव यांनी दिलीप पाटील यांच्या ‘साद प्रतिसाद’ आणि ‘काळ आणि माणूस’ या पुस्तकांतील निवडक लेखनाचे रसपूर्ण अभिवाचन केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. याच प्रसंगी ‘गमन’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सांस्कृतिक कलादर्पण रजनी पुरस्कार प्राप्त नारायण जाधव यांचा डॉ. अशोक पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ‘काळ आणि माणूस’ या पुस्तकाचा परिचय राजीव जोशी यांनी करून दिला, तर ‘पाथवे पोएम्स – जेंटल इंग्लिश व्हर्सेस फॉर क्वायट पाथवेज ऑफ लाइफ’ या कवितासंग्रहाचा परिचय सतीश सोळांकूरकर यांनी उपस्थितांना करून दिला.

प्रमुख पाहुणे नारायण लाळे आणि प्रा. अशोक बागवे यांनी आपल्या मनोगतात दिलीप पाटील यांच्या साहित्यनिर्मितीचे मनापासून कौतुक केले. समाजाभिमुख, विचारप्रवर्तक आणि काळाशी संवाद साधणाऱ्या लेखनाची आज अधिक गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पुस्तकांवरील चर्चेत नारायण लाळे, चांगदेव काळे, सनिद पाटील, अनंत जोशी, प्रकाश पाटील, किरण येले, मिलिंद मिरजकर, मनीष पाटील, प्रकाश गोठणकर, विकास भावे आणि अशोक गंगावणे यांनी अभ्यासपूर्ण समीक्षा सादर केली. साहित्यकृतींच्या आशय, शैली आणि सामाजिक संदर्भांवर त्यांनी परखड मते व्यक्त केली. डॉ. अशोक पाटील यांनीही आपल्या मनोगतात साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित केला.

समारोपावेळी विनया पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमात दिलीप पाटील यांच्या पत्नी सुजाता पाटील तसेच पुत्र सनिद पाटील आणि सुदीप पाटील यांचा उत्साही सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन आणि आयोजनात मुख्य आयोजक सुजाता पाटील तसेच त्यांचे पती, निवृत्त वरिष्ठ सीमाशुल्क अधिकारी सुनील पाटील यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे छायाचित्रण रमेश पवार (सुरभी स्टुडिओ) यांनी केले. त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी आयोजित स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

वैचारिक समृद्धी, अभ्यासपूर्ण चर्चा, रसपूर्ण अभिवाचन आणि साहित्यिकांच्या मुक्त संवादामुळे हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. उपस्थितांच्या मते, हा सोहळा केवळ पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम न ठरता साहित्य, संस्कृती आणि वैचारिक देवाणघेवाणीचा संस्मरणीय उत्सव ठरला. साहित्यविश्वासाठी हा सोहळा प्रेरणादायी आणि अविस्मरणीय पर्व ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker