पोलीस ठाण्याच्या नाकाखालीच 5 दुकाने फोडली! नायगाव मुख्य बाजारपेठेत चोरट्यांचा धुमाकूळ, व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नायगाव शहरातील कायदा-सुव्यवस्थेची पोलखोल करणारी घटना मध्यरात्री घडली. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य बाजारपेठेतील तब्बल 5 दुकानांची शटर वाकवून चोरट्यांनी धुमाकूळ घालत लुट केली. एकाच रात्री पाच ठिकाणी चोरी होऊनही पोलीस गस्तीवर नव्हते, यामुळे नायगाव पोलिसांच्या नाकर्तेपणावर आता थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नायगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले जनार्दन किराणा जनरल स्टोअर , राजस्थान स्वीट होम , स्वरा वॉच अँड मोबाईल गॅलरी , अजय फुटवेअर आणि प्रिन्स मल्टी सर्विसेस या पाच दुकांनाना चोरट्यांनी दि. 4 जुलैच्या रात्री लक्ष केले. चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश करून रोख रक्कमेसह महागडा माल लंपास केला. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आणि मुख्य रस्त्यावरच्या पाच दुकानात चोरटे बिनधास्तपणे चोरी करत असताना पोलीस यंत्रणा काय करत होती असा संतप्त सवाल व्यापारी करत आहेत. एका आठवड्यात दुसरी मोठी चोरी झाल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

“रात्री नाकाबंदी करून सर्वसामान्यांना लुटणारे पोलीस, चोरांना पकडण्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पोलीस ठाण्यातच अनागोंदी कारभार आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही,” अशी बोचरी टीका व्यापाऱ्यांनी केली. चार दिवसांपूर्वी झालेल्या चोरीनंतर पोलीस यंत्रणा अधिक दक्ष राहणे अपेक्षित होते. मात्र पोलीस प्रशासनाने बेपर्वाई दाखवल्यामुळेच चोरट्यांचे धाडस वाढले आहे. शहरात आता भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री दुकाने बंद करून घरी जाण्याचीही व्यापाऱ्यांना भीती वाटू लागली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हेडगेवार चौकात त्याच रात्री नाकाबंदी सुरू होती. मात्र नाकाबंदीच्या नावाखाली वाहने अडवून ‘वसुली’ करण्यात मग्न असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाजारपेठेत होणारी चोरी दिसलीच नाही हे विशेष.

एका आठवड्यात दोन मोठ्या चोऱ्या आणि पोलिसांचे अपयश यामुळे नायगाव शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. आता तरी पोलीस प्रशासन जागे होणार का, हाच खरा प्रश्न आहे. पाच ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेत किती मुद्देमाल चोरीला गेला याची अद्याप माहिती मिळाली नसली तरी या पाच घटनेतून पोलीस यंत्रणेचा गाफीलपणा समोर आला आहे.




