ताज्या बातम्यानांदेडनायगांव

9 लाख 70 हजाराच्या चोरी प्रकरणात श्वान पथक व ठसे तज्ञ फेल : पोलीस यंत्रणा लागली सी सी फुटेज खंगाळण्याच्या कामाला

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : नायगाव पंचायत समितीत कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या माधव कौटकर यांच्या घरात झालेल्या 9 लाख 70 हजार रुपयांच्या धाडसी घरफोडीचा तपास पोलिसांसमोर मोठे आव्हान बनला आहे. दि. 29 जून रोजी सकाळी पाचारण करण्यात आलेल्या श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या हातीही कोणताही पुरावा लागला नाही. त्यामुळे आता स्थानिक गुन्हे शाखा व नायगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे.

कौटकर यांनी प्लॉट खरेदीचा व्यवहार केला होता व सौदाचिठ्ठीही झाली होती. विक्रेत्याला रोख रक्कम द्यायची असल्याने व बँकेतून एकदाच मोठी रक्कम मिळत नसल्याने त्यांनी थोडी-थोडी करून 9 लाख 70 हजार रुपये बँकेतून काढून घरी ठेवले होते. खरेदी खताला उशीर होत असल्याने दि. 26 जून रोजी ते सहकुटुंब देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील संपूर्ण रोकड लंपास केली. दि. 28 जून रोजी रात्री उशिरा घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी दि. 29 रोजी सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना बोलावले. मात्र श्वान पथक काही अंतरावर जाऊन थांबले व ठसे तज्ज्ञांनाही कोणतेही स्पष्ट ठसे मिळाले नाहीत. त्यामुळे पोलिसांवरील तपासाचा दबाव आणखी वाढला आहे. आता स्थानिक गुन्हे शाखा व नायगाव पोलीस व्यंकटेश नगर व लगतच्या परिसरातील व्यापारी प्रतिष्ठाने, घरांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा करून तपासत आहेत. चोरट्यांचा सुगावा लागतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांचा संताप…
नायगाव शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र एकाही घटनेचा छडा लावण्यात नायगाव पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. केवळ घटनेची नोंद करण्यापलीकडे काहीही होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. “पोलिसांनी ही चोरी तरी गांभीर्याने घेतली पाहिजे,” अशी मागणी होत आहे.

पोलिसांसमोर आव्हान…
नूतन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्यासमोर ही पहिलीच मोठी केस असून चोरट्यांनी थेट शासकीय कर्मचाऱ्याच्या घरात हात साफ केल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही चोरी उघडकीस आणून पोलीस आपली विश्वासार्हता सिद्ध करतात का, हे येणाऱ्या काळात समजेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker