ताज्या बातम्यानांदेडनायगांव

जिल्हा बँक निवडणूक, ‘ब’ प्रक्रिया व पणनमधून भाजपचे श्रावण पाटील भिलवंडे रिंगणात : उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन

प्रकाश महिपाळे

नायगाव : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ‘ब’ प्रक्रिया व पणन मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे नरसीकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या एन्ट्रीमुळे या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची व प्रतिष्ठेची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शक्तिप्रदर्शनाने वेधले लक्ष…
उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. घोषणाबाजी व उत्साहपूर्ण वातावरणात अर्ज दाखल करण्यात आला. या शक्तिप्रदर्शनातून निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा पक्षाचा निर्धार स्पष्टपणे दिसून आला.

जिल्हा बँकेची निवडणूक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची लढत मानली जाते. जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि सहकारी गटांनी या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघात अटीतटीच्या लढती होण्याची चिन्हे असून उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

समीकरणे बदलणार…?
‘ब’ प्रक्रिया व पणन मतदारसंघात श्रावण पाटील भिलवंडे नरसीकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व भाजपची ताकद यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. अर्ज छाननीनंतर चित्र स्पष्ट होईल. मात्र नरसीकर यांच्या उमेदवारीने भाजपने थेट आव्हान उभे केल्याने विरोधी गटांची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश देशमुख कुंटूरकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार, युवा नेते रुपेश कुंटूरकर, आनंदराव बावणे भोपाळकर, माजी जि.प. सदस्य सूर्याजी चाडकर, भूषण परळकर, गोविंद नरसीकर, दत्ता पाटील होटाळकर, बालाजी गंगासागरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker