ताज्या बातम्यानांदेडनायगांव

वटपौर्णिमेनिमित्त नरसीत वन महोत्सव: सामाजिक वनीकरण विभागाकडून वड व फळझाडांचे वाटप

नायगाव (अंकुशकुमार देगांवकर): तालुक्यातील नरसी येथे २९ जून रोजी वटपौर्णिमेचे औचित्य साधत ‘वन महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, नायगाव यांच्या वतीने याप्रसंगी ‘वड पूजेसोबत वड लागवडीचा संकल्प’ ही संकल्पना राबवत स्थानिक महिलांना वडाच्या रोपांचे आणि विविध फळझाडांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला महिलांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘झाडे लावा, झाडे जगवा’ संदेशासह जनजागृती…
कार्यक्रमप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने उपस्थित महिलांना वडाच्या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व पटवून देण्यात आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “वडाचे झाड हे २४ तास ऑक्सिजन देणारे, पर्यावरणपूरक आणि दीर्घायुषी झाड आहे. त्यामुळे केवळ पूजा न करता वडाच्या झाडाची लागवड करणे काळाची गरज आहे.” यावेळी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश घराघरात पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले.

हा स्तुत्य उपक्रम नांदेडचे वन विभागीय अधिकारी संदीप चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक नितेश निगडे आणि नायगावचे वन परिक्षेत्र अधिकारी गडलिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. तर वनरक्षक वामन शेळके यांनी वन महोत्सव २०२६ चा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. नरसी येथील या नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक वटपौर्णिमा उत्सवाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker