नरसी-नायगाव मार्गावर मृत्यूचा प्रवास! अटोरिक्षा व ट्रकच्या अपघातात एक ठार सात गंभीर जखमी

प्रकाश महिपाळे
नायगाव : नरसी-नायगाव रस्त्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने बेशिस्त अटोरिक्षा वाहतुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अटोरिक्षा आणि ट्रकच्या धडकेत नरसी येथील शेख इस्माईल शेख मौलाना यांचा जागीच मृत्यू झाला, तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन शेळ्यांचाही मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की अटोरिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि काही प्रवासी रिक्षामध्येच अडकून पडले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २६ एन ५७६७ क्रमांकाच्या अटोरिक्षातून आठ प्रवासी आणि दोन शेळ्या नरसीहून नायगावकडे येत होते. यावेळी पेट्रोल पंपाजवळ एपी ३९ यू ५८१९ क्रमांकाचा ट्रक डिझेल भरण्यासाठी जात असताना भरधाव अटोरिक्षा ट्रकच्या मागील बाजूस जोरात धडकला. या अपघातात शेख इस्माईल शेख मौलाना यांचा मृत्यू झाला.
तर अनिता साहेबराव शिंदे (कुंटूर), गणेश इरवंत कंदूरके (धानोरा), करण शिवाजी पवार (नरसी), किरण खंडू भेदे (नरसी), संभाजी सूर्यकार (डोणगाव), फारुख खाजामिया कुरेशी (बेटमोगरा), शेख मगदूम (नरसी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नायगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
प्रवासी वाहतुकीच्या नावाखाली सुरू आहे जीवघेणा खेळ!
नरसी-नायगाव मार्गावर दररोज ३० ते ३५ अटोरिक्षा धावत आहेत. मात्र यातील अनेक अटोरिक्षांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत, अनेक वाहने कालबाह्य झाली आहेत, तर काही चालकांकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याच्या तक्रारी आहेत. तरीही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. प्रवासी क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरून धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, बेफाम वेग आणि नियमांची पायमल्ली यामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
वाहतूक विभागाने तातडीने नरसी-नायगाव मार्गावरील सर्व अटोरिक्षांची तपासणी करून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा अशा अपघातांची मालिका थांबणार नाही, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.



