रास्त भाव धान्य दुकानदाराच्या कमिशन मार्जिनचा प्रश्न सुटला! साखळी उपोषण स्थगित

जयवर्धन भोसीकर
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील २ हजार रास्त भाव धान्य दुकानदारांचे जानेवारी ते जून २०२६ या कालावधीतील प्रलंबित कमिशन मार्जिन अदा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याने रास्त भाव धान्य दुकानदारांनी १५ ऑगस्टपासून प्रस्तावित केलेले साखळी उपोषण स्थगित केले आहे.
रास्त भाव धान्य दुकानदारांना मागील सहा महिन्यांपासून कमिशन मार्जिन मिळाले नसल्याने त्यांच्या उपजीविकेवर आर्थिक परिणाम झाला होता. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी संबंधित तहसीलदारांना प्रलंबित कमिशन मार्जिन लवकरात लवकर अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रशासकीय कार्यवाहीबद्दल रास्त भाव धान्य दुकानदारांच्या संघटनेने जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, पुरवठा निरीक्षक तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतरही संयम राखणाऱ्या जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांचे संघटनेने विशेष आभार व्यक्त केले.
प्रलंबित कमिशन मार्जिन साठी प्रशासनाने गती दिल्याने १५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात येणारे साखळी उपोषण तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक जयवंतराव एडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कमिशन मार्जिनची प्रत्यक्ष रक्कम दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात झाले असल्याचे लेखी पत्र जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी दिल्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले असल्याचे जिल्हा अध्यक्ष अशोक एडके यांनी प्रसार माध्यमांना सांगीतले.



