ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मुख्यालयी राहत असल्याचे प्रमाणपत्र तत्काळ सादर करा अन्यथा आँगष्ट महिण्याचे घरभाडे कपात : गटविकास अधिकाऱ्याचा इशारा

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब समोर आली आहे. ग्रामसेवकांनी शासनाच्या आदेशानुसार मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी पंचायत समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असून त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

नायगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दि. ३० जुलै रोजी सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पत्र काढून मुख्यालयी वास्तव्यास राहण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने जन्म-मृत्यू दाखले, विविध प्रमाणपत्रे, घरकुल, पाणीपुरवठा, विकासकामे यांसह अनेक कामांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, ग्रामसेवकांना मुख्यालयी वास्तव्यास असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या पण आजपर्यंत कुणीही मुख्यालयी राहत असल्याचा ठराव व प्रमाणपत्र सादर केले नाही. शासन निर्णयानुसार मुख्यालयी राहत असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले असल्याने तत्काळ कार्यालयात सादर करावे अन्यथा आँगष्ट महिण्यात घरभाडे कपात करण्याचा इशाराही दिला आहे.

ग्रामीण भागातील प्रशासनाचा कणा असलेले ग्रामसेवकच जर गावात उपलब्ध नसतील तर शासनाच्या योजना आणि नागरिकांच्या समस्या यांच्यात मोठी दरी निर्माण होते. त्यामुळे केवळ कागदोपत्री उपस्थिती न दाखवता ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष गावात राहून आपली जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी आता पंचायत समिती प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्याची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker