नांदेडमध्ये १२ ऑगस्टपासून राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
२७० खेळाडूंचा सहभाग ; सलग २२ वर्षांची परंपरा कायम - सुंदर शेट्टी यांना जीवनगौरव पुरस्कार

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अंतर्गत नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन १२ ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान यशवंत कॉलेज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नांदेड येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तब्बल २७० खेळाडूंच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मागील सलग २२ वर्षांपासून नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. सलग २२ वर्षे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणारी नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटना देशातील पहिली जिल्हा संघटना असल्याचा मान संघटनेला मिळाला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, अध्यक्षस्थानी जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री मा. श्री. डी. पी. सावंत राहणार आहेत. उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चास्कर उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री. सिद्धार्थ पाटील, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने व जिल्हा क्रीडा अधिकारि श्री भैरवनाथ नाईकवाडी, यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेत पुरुष व महिला एकेरी, दुहेरी तसेच मिश्र दुहेरी सामने होणार असून, मुख्य पंच म्हणून पुणे येथील श्री. पारिजात नातू काम पाहणार आहेत.
या उद्घाटन समारंभात महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे माजी सचिव तथा ज्येष्ठ बॅडमिंटन प्रशासक श्री. सुंदर शेट्टी यांना नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शेट्टी यांनी पाच दशकांहून अधिक काळ निस्वार्थपणे बॅडमिंटनच्या विकासासाठी दिलेले योगदान, त्यांची कार्यनिष्ठा व संघटन कौशल्य यामुळे ते क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष मा. श्री. डी. पी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे सचिव डॉ. महेश वाकरडकर तसेच पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.



