नांदेड-हैदराबाद महामार्गावरील हिरवेगार डोंगर धोक्यात; महसूल विभागाच्या आशीर्वादामुळे मुरूम माफीयांचे ‘रॅकेट’ सक्रिय?

अंकुशकुमार देगांवकर
नायगाव : नायगाव तालुक्यातील कुष्णूर येथील निसर्गसौंदर्याने नटलेले डोंगर आणि हिरवेगार परिसर सध्या मुरूम माफियांचे बालेकिल्ले बनले आहेत. नांदेड-हायदराबाद महामार्गालगत असलेल्या या नैसर्गिक टेकड्यांवर रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने राक्षसी पद्धतीने अवैध उत्खनन सुरू असून, संपूर्ण डोंगराचा आकारच बदलून टाकला जात आहे. या प्रकारामुळे परिसराचे नैसर्गिक सौंदर्य पूर्णपणे संपुष्टात येत असून महसूल विभागाच्या संशयास्पद भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शासकीय नियमांनुसार मुरूम उत्खननासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, माफिया केवळ १०० ब्रासची किरकोळ परवानगी काढायची आणि स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हजारो ब्रास मुरूमाचा अवैध उपसा करायचा, असा नवा फंडा वापरत आहेत. विशेषतः औद्योगिक वसाहतीच्या परिसरात रात्र होताच माफियांचा हौदोस सुरू होतो. मोठ्या यंत्रांमुळे परिसरात डोंगरांच्या जागी धोकादायक आणि मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
मंडळ अधिकाऱ्यांनी सोडून दिले जेसीबी अन् हायवा?
दोन दिवसांपूर्वी अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलेले एक जेसीबी आणि दोन हायवा ट्रक कोणतीही ठोस कारवाई न करता सोडून दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरूनच या वाहनांना सोडून देण्यात आले. त्यामुळे “रात्रीची ही चोरी नेमकी कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. केवळ कागदी घोडे न नाचवता या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास; निसर्गप्रेमी आक्रमक
डोंगरांच्या बेसुमार उत्खननामुळे मातीची धूप होणे, पावसाचे पाणी वाहून जाणे आणि भूजल पातळी खालावणे असे गंभीर पर्यावरणीय धोके निर्माण झाले आहेत. कुष्णूरचे निसर्गसौंदर्य आता केवळ इतिहासात जमा जमा होण्याची भीती व्यक्त करत, निसर्गप्रेमींनी या विनाशास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
कुष्णूर परिसरातील उत्खननाची महसूल विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून अक्षांश-रेखांशानुसार मोजमाप करावे. दोन दिवसांपूर्वी पकडलेली वाहने सोडून देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. रात्रीच्या वेळी महामार्गावर होणाऱ्या अवैध वाहतुकीवर रोख लावण्यासाठी विशेष भरारी पथक तैनात करावे.
अवैध रित्या होणारी मुरूमाची चोरी कधी थांबणार,मुरूम माफियानावर कारवाई होणार की रात्रीची चोरी चालूच राहणार असे गंभीर प्रश्न महसूल विभागावर उपस्थित केले जात आहेत.



