गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

लोहगावच्या तरुणाची आत्महत्या कि हत्या गुढ कायम : मयताच्या भावाने संशय व्यक्त करत केली चौकशीची मागणी

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : नरसी पोलीस चौकीपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसी-बिलोली मार्गावरील एका शेतातील लिंबाच्या झाडाला २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मयताच्या भावानेही आपल्या जबाबात हत्येचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

लोहगाव (ता. बिलोली) येथील दीपक बालाजी वानोळे या तरुणाचा मृतदेह गुरुवारी पहाटे नरसी-बिलोली रोडवरील फौजा हॉटेलसमोरील शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून पुढील प्रक्रिया सुरू केली.

दरम्यान, घटनास्थळी मृतदेहाच्या अवस्थेवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत तरुणाचा चेहरा कापडाने झाकलेला होता, दोन्ही हात बांधलेले होते तसेच हातावर जखमांचे व्रण दिसून आले. त्यामुळे अज्ञात व्यक्तींनी दीपकचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडाला लटकवला असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर दीपक बालाजी वानोळे हा नांदेड येथे वास्तव्यास असून एका औषध कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली. त्याचा भाऊ शिवप्रसाद बालाजी वानोळे यांनी रामतीर्थ पोलिसांना दिलेल्या जबाबात, “माझ्या भावाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असावी,” असा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे.

लोहगाव परिसरात दीपक वानोळे याचा नियोजनपूर्वक खून करून मृतदेह येथे आणल्याची चर्चा सुरू आहे. मात्र पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नसल्याने नातेवाईकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी सांगितले की, “मयताच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून चौकशीची मागणी केली आहे. मयताने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच घटनेच्या आदल्या दिवशी भावासोबत चॅट करताना आत्महत्या करण्याचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे. आज अंत्यविधी असल्याने नातेवाईक ठाण्यात येऊ शकले नाहीत. शुक्रवारी या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल.”

दरम्यान, दीपक वानोळे याच्या मृत्यूमागील नेमके कारण काय? हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात? याचे गूढ पोलिस तपासानंतरच उलगडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker