बापाच्या पैशावर काळजाच्या तुकड्यानेच मारला मैत्रीणीच्या संगणमताने डल्ला : स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या 9 लाख 36 हजाराची रक्कम जप्त

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : “बाप तेची लेक, कपाळ करंटे” या म्हणीचा प्रत्यय नायगावात आला. प्लॉट घेण्यासाठी वडिलांनी घाम गाळून जमवलेल्या 9 लाख 70 हजार रुपयांच्या रकमेवर पोटच्या मुलानेच अल्पवयीन मैत्रिणीच्या संगनमताने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) उघडकीस आणला आहे. आरोपी शुभम कौटकर व विधिसंघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेऊन पोलिसांनी 9 लाख 36 हजार 600 रुपयांची रोकड जप्त केली आहे.
नायगाव पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक माधव कौटकर यांच्या व्यंकटेश नगरातील भाड्याच्या घरात दि. 28 जून रोजी धाडसी घरफोडी उघडकीस आली होती. प्लॉट खरेदीसाठी जमवलेली 9.70 लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. नायगाव पोलिसांसह श्वान पथक, ठसे तज्ज्ञही हतबल ठरल्याने तपासाचा भार स्थानिक गुन्हे शाखेवर आला. पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे चे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पथकाला कामाला लावले. पोउपनि नागनाथ तुकडे व पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयाची सुई फिर्यादीचा मुलगा शुभमकडेच वळल्याने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या शुभमने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
असा रचला कट…
कुटुंब देवदर्शनाला जाणार असल्याची, घराच्या अतिरिक्त चावीची जागा व लोखंडी पेटीत 9.70 लाख रोख असल्याची इत्यंभूत माहिती शुभमने अल्पवयीन मैत्रिणीला दिली. दि. 26 जून रोजी कुटुंब बाहेर पडताच मैत्रिणीने अतिरिक्त चावीने घर उघडून पेटीतील 9.70 लाख रुपये लंपास केले चोरीनंतर दोघांनी रक्कम लपवून ठेवली.
शुभमच्या कबुलीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच्याकडून व विधिसंघर्षग्रस्त बालिकेकडून 9,36,600 रुपये रोख हस्तगत केले. उर्वरित रक्कम खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काळजाचा तुकडाच घरफोड्या निघाल्याने कौटकर दाम्पत्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे. “पोरासाठीच कष्टाने पै पै जोडली, तोच असा निघाला,” अशी हताश प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली.
या गुन्ह्याचा तपास लावण्यात नायगाव पोलिसांना अपयश आल्याने नागरिकांतून टीका होत होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने ने दोन दिवसांत गुन्हा उघड करून जप्तीची कारवाई केल्याने पोलिसांची विश्वासार्हता काही प्रमाणात सावरली आहे.



