उपविभागीय पोलीस पथकाची धडक कारवाई; 92 हजारांचा अवैध देशी दारू साठा जप्त, 19 वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नांदेडचे पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध दारूविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या पथकाने घुंगराळा-बळेगाव मार्गावर सापळा रचून अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ‘भिंगरी संत्रा’ देशी दारूच्या 240 बाटल्या व होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली यांचे विशेष पथक कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत दि. 30 जुन रोजी पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी एक इसम मोटारसायकलवरून घुंगराळा-बळेगाव मार्गे अवैध देशी दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचला व संशयिताचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपले नाव तिरुपती बाबाराव बेलकर, वय 19 वर्षे, रा. बळेगाव, ता. नायगाव, जि. नांदेड असे सांगितले. पंचांसमक्ष MH-26 CR-5372 क्रमांकाच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलची झडती घेतली असता त्यात 180 मि.ली. क्षमतेच्या ‘भिंगरी संत्रा’ लेबल असलेल्या 240 काचेच्या देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. दारूची अंदाजे किंमत 19,200 रुपये व मोटारसायकलसह एकूण 92,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 160/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर व पथकातील पोलीस अंमलदार संजय चरकुलवार, बाबुराव गंदपवार यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
कुंटूंर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळेगाव येते मागच्या अनेक वर्षांपासून अवैध दारु विक्री होत आहे पण याकडे कुंटूंर पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. तरीही अवैध दारु विक्रीत काहीही फरक पडला नाही.



