ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मांजरम गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था; “रस्त्यात नाली की नालीत रस्ता?” नागरिकांचा संताप

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मांजरम गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, सर्वत्र खड्डे, साचलेले सांडपाणी आणि रस्त्यावर पडलेला कचरा यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. “रस्त्यात नाली की नालीत रस्ता?” असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. मागील पाच वर्षांपासून गावातील परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यांवर साचलेले घाण पाणी आणि कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्ती वाढल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

दररोज शाळेत जाणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना या रस्त्यांवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पायी चालणेही कठीण झाले असून अपघाताचा धोका कायम आहे. केंद्र व राज्य सरकारकडून स्वच्छता आणि ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असताना मांजरम गावात मात्र विकासाचा मागमूस दिसत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीला मिळालेला स्वच्छता व विकासाचा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा सवाल नागरिक उपस्थित करत असून, निधीच्या वापराबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणीही होत आहे.

ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन, पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची कामे त्वरित हाती घ्यावीत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.

“ग्रामपंचायत नावाची व्यवस्था गावात प्रत्यक्ष काम करते का, हा आमच्यासमोर पडलेला प्रश्न आहे. रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातही माणसं राहतात, याचा विसर स्थानिक प्रशासनाला पडल्याचे चित्र दिसत आहे. आमची मागणी आहे की, तात्काळ उपाययोजना कराव्यात; अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल.”
पांडुरंग शिंदे (मांजरमकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker