ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव येथे धाडसी चोरी : प्लॉट खरेदीसाठी जमवलेली 9 लाख 70 हजाराची रक्कम चोरट्यांनी लांबवली

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव :- पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेले माधव कौटकर यांच्या भाड्याच्या घरात धाडसी घरफोडी झाल्याची घटना दि. 28 रोजी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातून 9 लाख 70 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे कौटकर कुटुंबाला धक्का बसला आहे.

माधव कौटकर हे नायगाव शहरातील व्यंकटेश नगर भागात मिरेवाड यांच्या घरी किरायाने राहतात. प्लॉट खरेदीसाठी त्यांनी ‘एक एक रुपया’ जोडून 9 लाख 70 हजारांची रक्कम घरातच ठेवली होती. दि. 26 जून रोजी ते सहकुटुंब देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. दि. 28 जून रोजी रात्री उशिरा घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कपाटातील प्लॉटसाठी जमवलेली संपूर्ण रक्कम गायब होती.

चोरीची माहिती मिळताच कौटकर यांनी तात्काळ नायगाव पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रात्री उशीर झाल्याने सकाळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार दि. 29 जून रोजी सकाळी श्वान पथक दाखल झाले असून तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस कर्मचारी माधव पवार यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून नायगाव शहर व परिसरात घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नायगाव पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. या चोरीच्या घटनेचा पोलीस कसून तपास करतात की ही घटना केवळ ‘फाईल’ पुरती मर्यादित राहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शहरात रात्रीची गस्त वाढवावी, जुने गुन्हेगार तपासावे व चोरट्यांना तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker