ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव येथे मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचे बीएलओ व सुपरवायझर यांना प्रशिक्षण संपन्न!


​नायगाव : नायगाव तालुक्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाला गती देण्यासाठी आज दिनांक २६ जून २०२६ रोजी तहसील कार्यालय, नायगाव शेजारील बहुउद्देशीय सभागृहात एका महत्त्वपूर्ण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात तालुक्यातील एकूण १७१ बीएलओ (BLO) आणि १७ सुपरवायझर यांना मतदार यादी शुद्धीकरणाच्या कामाबाबत सविस्तर तांत्रिक व व्यावहारिक मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नायगावच्या तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी सांगितले की, आगामी काळात मतदार याद्यांचे अचूक व पारदर्शक शुद्धीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या महिनाभराच्या कालावधीत सर्व बीएलओ यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घ्याव्या व त्यांना दिलेला इनुम्रेशन फॉर्म संबंधित मतदाराकडून अचूक भरून घ्यावा. सदर माहिती गोळा केल्यानंतर ती तातडीने ‘बीएलओ ॲप’ (BLO App) वर अपलोड करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच सन २००२ च्या ऐतिहासिक मतदार यादीशी मॅपिंग करून सद्यस्थितीतील मतदार याद्यांचे पूर्णपणे शुद्धीकरण करण्यात यावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

महिनाभराची विशेष मोहीम आणि सहकार्याचे आवाहन…
दिनांक ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेत पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांनी बीएलओ यांच्या कामात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नायगाव तालुक्यातील सर्व सजग नागरिकांनी व मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओ अधिकाऱ्यांना आवश्यक व अचूक माहिती देऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

या प्रशिक्षण शिबिरास सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ.धम्मप्रिया गायकवाड (तहसीलदार, नायगाव खै.), श्री.वानखेडे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती नायगाव), श्रीमती गंधाली पवार (मुख्याधिकारी, नगर पंचायत नायगाव), श्री.मंदार इंदुरकर, श्रीमती सिमा नाशिककर व श्री.सतीश भीमराव कुलकर्णी (नायब तहसीलदार, नायगाव) आदी वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रशिक्षण सत्र संपल्यानंतर सर्व बीएलओना मतदार यादीच्या कामकाजासाठी आवश्यक असणारे साहित्य व इनुम्रेशन फॉर्म्सचे तहसील कार्यालयाकडून थेट वितरण करण्यात आले.

या शिबिराला तालुक्यातील सर्व बीएलओ, सुपरवायझर, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार आणि सर्व राजकीय पक्षांचे तालुका प्रतिनिधी व त्यांचे बीएलए (BLA) मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी श्री. साईनाथ भंडारे, श्री. गोविंद कोम्पलवाड, श्री. अशोक भालेराव, श्री. सुनील हंबर्डे, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष श्री. सुधाकर डोईवाड, श्री. दिगंबर गिरी व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker