महावितरणच्या बेपर्वाईमुळे उमरी तालुक्यातील निमटेक येथे 24 वर्षीय तरुणाचा बळी एक बैलही दगावला

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : महावितरणच्या हलगर्जीपणाचा कळस गाठणारी घटना उमरी तालुक्यातील निमटेक शिवारात घडली. शेतात रासणी करण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय असलम जलीलसाहब शेखचा विजेच्या खांबाच्या ताणतारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत औताला जुंपलेल्या बैलाचाही जागीच बळी गेला. वारंवार तक्रारी करूनही महावितरणने दखल न घेतल्याने हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.
गुरुवारी सकाळी 9.30 वाजता असलम शेख हा निमटेक ता. उमरी येथील शेतकरी विठ्ठल लक्ष्मण चंदापुरे यांच्या शेतात रासणी करण्यासाठी गेला होता. शेतातील विजेच्या खांबाच्या दोन्ही बाजूच्या ताणताऱ्यांमधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरलेल्या ताणतारेला स्पर्श होताच असलम शेख व सोबतच्या बैलाला जोरदार विजेचा झटका बसला. दोघेही जागीच कोसळले आणि क्षणार्धात प्राण गमावले.
“ताणताऱ्यांमधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरतो, याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी महावितरणला कळवले होते. मात्र प्रशासनाने एकदाही दुरुस्तीसाठी पाऊल उचलले नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच आज एका निष्पाप मुलाचा व बैलाचा बळी गेला,” असा संतप्त आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केला. पहिल्याच पावसात खांबात करंट उतरणे हे महावितरणच्या निकृष्ट कामाचे व बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मृत बैल औताला जुंपलेला होता. ऐन पेरणीच्या तोंडावर बैल गेल्याने शेतकरी विठ्ठल चंदापुरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. “बैल गेला, पोरगा गेला. याला जबाबदार कोण?” असा हंबरडा फोडत कुटुंबीयांनी महावितरणला दोषी धरले आहे.
केवळ बिलवसुलीसाठी तत्पर असणारे महावितरण जीवितहानीच्या बाबतीत मात्र कमालीचे बेफिकीर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण निमटेकसह उमरी तालुका हादरला असून महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सदरील घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी उमरी पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, पोउपनि महेंद्र कुमार पोपुलवार, जमादार गामाजी कानगुलवार, राईटर नवनाथ सिदने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. असलमचा मृतदेह उमरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात असलमवर अंत्यसंस्कार करण्यात आले.



