मराठी गझलला विद्यापीठात मान्यता; मारोती मानेमोड यांच्या ‘राया’ गझलेचा बी.ए. अभ्यासक्रमात समावेश

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : मराठी गझलच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद टप्पा गाठत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी बी.ए. तृतीय वर्षाच्या स्वतंत्र ५० गुणांच्या ‘मराठी गझल’ या अभ्यासपत्रिकेत गझलकार मारोती मानेमोड यांच्या ‘राया’ ‘निर्गुणी आकार’ या गझलसंग्रहातील ‘मनाच्या खिन्न लहरीवर’ या गझलेचा समावेश केला आहे. मराठी गझलेसाठी प्रथमच स्वतंत्र अभ्यासपत्रिका तयार होऊन त्यात समकालीन गझलकाराच्या रचनेचा समावेश झाल्याने साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे.
नायगाव तालुक्यातील नरसी या गावातील सामान्य कुटुंबातून पुढे आलेले मारोती मानेमोड हे सध्या जिल्हा परिषद, अमरावती येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ‘राया’ या टोपणनावाने त्यांनी मराठी गझल क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या साहित्याला वाचक आणि समीक्षकांकडून मोठी दाद मिळाली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, एल्गार मराठी गझल संमेलन तसेच विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी गझलच्या प्रसार आणि संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या साहित्यिक, गझलकार, संस्था आणि गझलप्रेमींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या निर्णयामुळे मोठी दाद मिळाल्याची भावना साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे. गझल मंथन साहित्य संस्था आणि अखिल भारतीय मराठी गझल परिषद यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाचे स्वागत करत हा निर्णय मराठी गझलच्या इतिहासातील मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे.
मारोती मानेमोड यांच्या ‘राया’ गझलेचा विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना समकालीन मराठी गझलेचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळणार असून, संशोधनाला चालना मिळेल आणि नव्या पिढीतील गझलकारांसाठी ही प्रेरणादायी घटना ठरेल, असा विश्वास साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हा निर्णय मराठी गझलच्या समृद्ध परंपरेला नवी उंची देणारा ठरणार आहे.



