शॉर्टसर्किटमुळे घराला आग ; चिटमोगरा येथे साडेतीन लाखांचे नुकसान

शेषेराव कंधारे
नायगाव :- रामतीर्थ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चिटमोगरा येथील रेखाबाई रामा देवाले यांच्या घराला मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्य तसेच रोख रक्कम जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेखाबाई देवाले यांनी नेहमीप्रमाणे सकाळी उठून दैनंदिन कामे आटोपली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास घरातील केबल वायरमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणातच आगीने भडका घेतल्याने घरातून धूर निघू लागला.

धूर दिसताच रेखाबाई देवाले यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक तत्काळ मदतीसाठी धावून आले. गावकऱ्यांनी पाण्याच्या बादल्यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दुपारी १२ वाजेपर्यंत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

मात्र तोपर्यंत घरातील फ्रीज, दिवाण, कपाट, कूलर, धान्य (तूर, हरभरा, ज्वारी), कपडे तसेच अन्य साहित्य पूर्णतः जळून खाक झाले होते. यासोबतच अंदाजे ५० हजार रुपये रोख रक्कम आगीत नष्ट झाले. या घटनेत एकूण सुमारे ३ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सदर घटनेचा पंचनामा करून शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी रेखाबाई रामा देवाले यांनी तहसील कार्यालय बिलोली तसेच रामतीर्थ पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



