असंघटित कामगारांना पेन्शन मिळवून देण्याची शेवटची संधी; ‘पीएम-एसवायएम’ नोंदणी मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू

प्रकाश महिपाळे
नांदेड :- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM-SYM) योजनेतंर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी राबविण्यात येत असलेली विशेष नोंदणी मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या ३१ मार्च २०२६ पर्यंत पात्र लाभार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
काय आहे ही योजना?
ही योजना विशेषतः घरकामगार, मजूर, वीटभट्टी कामगार, रिक्षाचालक आणि इतर असंघटित कामगारांसाठी आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर या कामगारांना दरमहा ३,००० रुपये निश्चित पेन्शन मिळवून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेची वैशिष्ट्ये आणि पात्रता:
- वयोमर्यादा: १८ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्ती.
- उत्पन्न मर्यादा: मासिक उत्पन्न १५,००० रुपयांपर्यंत असावे.
- अल्प योगदान: वयानुसार दरमहा केवळ ५५ ते २०० रुपयांपर्यंत गुंतवणूक.
- शासनाचा वाटा: जेवढे योगदान कामगार देईल, तेवढीच रक्कम केंद्र सरकारही जमा करणार.
नोंदणीसाठी कुठे संपर्क साधाल?
पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांसह (आधार कार्ड आणि बँक पासबुक) जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर संपर्क साधावा. तसेच, इच्छुक उमेदवार अधिकृत पोर्टल maandhan.in वर जाऊनही आपली नोंदणी करू शकतात.
ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची
या मोहिमेत ग्रामपंचायत आणि पीआरआय (PRI) प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गावातील एकही पात्र लाभार्थी या सुरक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचे आणि नोंदणीसाठी मदत करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
”आपल्या गावातील कष्टकऱ्यांचे हात म्हातारपणी रिकामे राहू नयेत, यासाठी ही पेन्शन योजना अत्यंत गरजेची आहे. सर्व प्रतिनिधींनी या मोहिमेत सहभागी होऊन कामगारांचे भविष्य सुरक्षित करावे,” असे आवाहन ग्रामविकास विभागामार्फत करण्यात आले आहे.



