सगरोळी वाळू घाट कारवाई की बनाव? नांदेड पोलीस दलात ‘गृहकलह’ चव्हाट्यावर; महसूल विभागाचेही संशयास्पद मौन!

प्रकाश महिपाळे
नांदेड : जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर झालेल्या एका मोठ्या कारवाईने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडवून दिली आहे. विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने केलेल्या या धाडसी कारवाईनंतर आता स्थानिक पोलीस प्रशासनानेच त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे “नेमके खरे कोण आणि खोटे कोण?” असा पेच निर्माण झाला असून, पोलीस दलातील अंतर्गत वाद (गृहकलह) आणि महसूल विभागाची संशयास्पद भूमिका आता चव्हाट्यावर आली आहे.
काही दिवसांपूर्वी आयजींच्या विशेष पथकाने सगरोळी येथील वाळू घाटावर अचानक धाड टाकली होती. या कारवाईत पथकाने तब्बल ३६ हायवा आणि ८ पोकलेन मशीन जप्त केल्याचा दावा केला होता. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच कारवाई असल्याने सर्वत्र पथकाचे कौतुक झाले. मात्र, या कारवाईला आता बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी आव्हान दिले आहे.
पोलीस निरीक्षकांचा खळबळजनक दावा
पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मते, ज्या दिवशी ही कारवाई झाली, त्या दिवशी सगरोळी येथील वाळू घाट अधिकृतपणे ‘बंद’ होता. जर घाट बंद होता, तर आयजींच्या पथकाने इतकी मोठी यंत्रसामग्री तिथून कशी जप्त केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या परस्परविरोधी विधानांमुळे पोलीस दलात दोन गट पडल्याचे चित्र दिसत असून, पथकाच्या कारवाईला ‘गाललोट’ लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महसूल विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
या संपूर्ण पोलीस ‘गृहकलहा’त आता महसूल विभागाच्या भूमिकेकडेही बोट दाखवले जात आहे. वाळू घाटांचे संचलन आणि अवैध उपशावर दंडात्मक कारवाई करण्याचे मुख्य अधिकार महसूल विभागाकडे असतात.
- पंचनाम्याचा अभाव: आयजींच्या पथकाने ३६ हायवा आणि ८ पोकलेन जप्त केल्याचा दावा केल्यानंतर, नियमानुसार महसूल विभागाच्या तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करणे आवश्यक होते.
- तहसीलदारांचे मौन: घाटावर इतकी मोठी यंत्रसामग्री कार्यरत असताना स्थानिक महसूल यंत्रणेला याची पुसटशीही कल्पना नसावी, हे आश्चर्यकारक मानले जात आहे. पोलीस आणि आयजींच्या पथकातील वादात महसूल विभागाने अद्याप आपली अधिकृत बाजू स्पष्ट केलेली नाही, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलीस निरीक्षक भोसले पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
विशेष म्हणजे, पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. दीड महिन्यापूर्वी जुगार अड्डा प्रकरणात त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली होती. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच ते पुन्हा बिलोलीत रुजू झाले होते. मात्र, रुजू होताच सगरोळी घाट प्रकरणामुळे ते पुन्हा एकदा प्रशासकीय पेचात सापडले आहेत.
वाळू माफियांचे धाबे दणाणले की साटेलोटे?
सगरोळी वाळू घाटातून दररोज शेकडो हायवा भरून वाळू शेजारील तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात तस्करी केली जाते, अशा तक्रारी नागरिकांनी अनेकदा केल्या आहेत. आयजींच्या पथकाने कारवाई केल्यानंतर वाळू माफियांना लगाम बसेल अशी आशा होती. मात्र, आता स्थानिक पोलिसांनीच ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात उभी केल्याने, “स्थानिक पोलीस आणि महसूल यंत्रणा वाळू माफियांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का?” असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होणार की हा ‘गृहकलह’ असाच सुरू राहणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



