शंभर पदकांचा मानकरी दत्ता भारती हलाखीत : प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : व्हीलचेअर क्रिकेट, अॅथलेटिक्स, पॉवर लिफ्टिंग, बॅडमिंटन, पॅरा डार्ट्स अशा 5 खेळांत राज्य व राष्ट्रीय स्तरावर 100 हून अधिक पदके जिंकणारा दिव्यांग खेळाडू दत्ता भारती आज उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. शासनाच्या एकाही योजनेचा लाभ न मिळाल्याने व स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने भारती कुटुंबासह हलाखीचे जीवन जगत आहे.

नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असून आईवडील मजूरी करतात पण दत्ता भारतीला खेळाची आवड असल्याने तो मागच्या पाच- सहा वर्षांपासून विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होवून पदके मिळवली आहेत. त्यातच चार वर्षांपूर्वी उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे गुडघ्यापासून पायच तोडावा लागला आहे. अकाली आलेल्या अपंगत्वावर मात करुन मोठ्या जिद्दीने तो विविध क्रीडा स्पर्धा गाजवतो. घरची हालाखीची परिस्थिती असतांनाही तो त्या परिस्थितीवर मात करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो पण त्याच्या प्रयत्नाला कुणाचेच बळ मिळत नाही.
व्हीलचेअर क्रिकेट, अॅथलेटिक्स, पॉवर लिफ्टिंग, बॅडमिंटन, पॅरा डार्ट्स अशा 5 खेळांत राज्य व राष्ट्रीय स्तरावर 100 हून अधिक पदके जिंकणारा दिव्यांग खेळाडू दत्ता भारती अतिशय हालाखीची जीवन जगत आहे. त्याला अंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे आहे पण कुणीही मदत करण्यास तयार नाही. भारतीने आमदार, खासदार, जिल्हाधिकारी व विविध अधिकाऱ्यांची उंबरवठे झिजवली पण या गुणवंत खेळाडूबद्दल कुणालाही मायेचा पाजर फुटला नाही.
देशासाठी 100 पदके जिंकली. तिरंगा मानाने मिरवला. पण आज दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. व्हीलचेअर नाही तुटक्या कुबड्याच्या सहायाने तो फिरतो., नवीन घ्यायला पैसे नाहीत. शासनाने किमान नोकरी दिली तरी कुटुंब जगेल. दत्ता भारती सारखे अनेक दिव्यांग खेळाडू वाऱ्यावर आहेत,” असे भारती यांनी सांगितले.
खेळाडूसाठी शासन जी आर काढते पण अंमलबजावणी नाही. पॅरा खेळाडूंसाठी स्वतंत्र क्रीडा धोरण असूनही जिल्हा स्तरावर निधीच वितरित होत नाही. दत्ता भारतीसारख्या खेळाडूंना ‘खेलो इंडिया पॅरा’ अंतर्गत तातडीने 5 लाखांची मदत व क्रीडा कोट्यातून नोकरी देणे गरजेचे आहे. यासाठी कोणताच लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी मदत करण्यास तयार नाही.
देशासाठी विविध क्रिडा स्पर्धेत 100 पदके मिळवलेल्या दत्ता भारतीला रोजंदारीचे काम नाही. व्हीलचेअर नाही सरावासाठी साहित्य नाही. अशा गुणवंत खेळाडूला आता समाजातील दानशूरांनीच पुढाकार घेवून मदत करण्याची गरज आहे त्यामुळे दत्ता भारती यांचा संपर्क नंबर देत असून (9168839871) दानशूरांनी त्यांच्याशी संपर्क साधून मदत करावी असे आवाहण करण्यात येत आहे.



