गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पहील्याच दिवशी गणवेश मिळण्याची शक्यता धुसर

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. शासनाने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. मात्र नायगाव पंचायत समिती अंतर्गत प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत इ. 1 ली ते 8 वी च्या प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षाला दोन गणवेश मोफत देणे बंधनकारक आहे. 15 जूनपूर्वी खरेदी पूर्ण करून 15 जूनला वाटप करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाचे आहेत. त्यानुसार नायगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने नियोजन करुन पहील्याच दिवशी गणवेश मिळतील याची व्यवस्था करणे आवश्यक होते. प्रभारी गटशिक्षणाधिकारी याबाबत उदासीनता दाखवली असल्याने नायगाव तालुक्यात संपूर्ण शाळांनी गणवेश खरेदीचा प्रस्तावच दाखल केला नाही. परिणामी पहील्याच दिवशी गणवेश मिळणार का याबाबत सांशकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे नायगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा प्रभारी कारभार उमरीचे गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांचेकडे आहे. मात्र ते नायगाव तालुक्याच्या बाबतीत अतिशय बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येते. तालुक्यात किती विद्यार्थी आहेत, किती शाळांचे प्रस्ताव आले, गणवेश खरेदीसाठी किती निधी आला याची माहितीच गटशिक्षणाधिकारी दर्शनवाड यांच्याकडे नाही आणि ते निर्लज्जपणे मान्यही करतात.
नायगाव तालुक्यात जवळपास दहा हजार विद्यार्थी असून प्रती विद्यार्थी 240 रुपये या नुसार निधी प्राप्त झाला आहे. तालुक्यातील शाळांनी गणवेश खरेदी केल्याचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर पंचायत समितीच्या स्तरावरुन निधी संबधीताच्या खात्यात वर्ग करण्यात येतो. परंतु गणवेश खरेदीचे प्रस्तावच आले नसल्याने निधी पडून आहे. यावरून असे दिसून येते की, तालुक्यातील शिक्षक आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी दर्शनवाड यांच्यात कुठलाच समन्वय नाही. समन्वय असता तर तालुक्यातील शिक्षकांनी शालेय शिक्षण समितीच्या मदतीने आजपर्यंत गणवेश खरेदी केले असते.
गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षकात समन्वयाचा अभाव आणि भोंगळ व नियोजनशून्य कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता असून. पहिल्याच दिवशी गणवेश न मिळल्यास याला जेवढे प्रभारी गटशिक्षणाधिकारी कारणीभूत असतील तेवढेच तालुक्यातील शिक्षकही जबाबदार असणार आहेत.
शाळेच्या गणवेश खरेदीबाबत दर्शनवाड यांनी मोबाईल नंबर दिलेल्या विजय कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता एक दोन शाळांनीच प्रस्ताव दाखल केला असून अंदाजित २० लाख रुपये निधी प्राप्त आहे असे सांगितले.



