नांदेड विधान परिषद निवडणूक : मतदार नगरसेवक ‘नॉट रिचेबल’, उमेदवाराची निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठा वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार व नांदेड-वाघाळा महापालिकेचे गटनेते इंजी. प्रशांत इंगोले यांनी मतदार असलेले अनेक नगरसेवक संशयास्पदरित्या अनुपस्थित असल्याची तक्रार निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे यांच्याकडे केली आहे.
इंजि.प्रशांत इंगोले यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रचारासाठी नांदेड-वाघाळा मनपा व जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपरिषदांमधील मतदार नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या संख्येने नगरसेवकांचे मोबाईल बंद किंवा ‘नॉट रिचेबल’ लागत आहेत. प्रत्यक्ष भेटीसाठी गेल्यानंतरही ते उपलब्ध झाले नाहीत. लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित असताना त्यांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती अनेक शंका निर्माण करणारी आहे. मागील काही निवडणुकांमध्ये राजकीय दबाव, प्रलोभनाने निवडणुकांवर प्रभाव टाकल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे मतदारांना इच्छेविरुद्ध एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे का, त्यांच्यावर दबाव आहे का, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे, असे इंगोले यांनी पत्रात नमूद केले आहे.
सदरच्या प्रकाराबाबत यंत्रणांमार्फत तातडीने चौकशी करावी. मतदार नगरसेवकांची सुरक्षितता व मतदानाचे स्वातंत्र्य सुनिश्चित करावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पार पाडावी. अशी मागणी निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे यांचेकडे इंगोले यांनी केली आहे. सर्व मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता येईल याची हमी देणे आयोगाला बंधनकारक आहे. तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत मतदार असलेल्या नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थिती ही चिंता वाढवणारी बाब आहे.



