
अँड.उमर शेख
माणसाचे शरीर हे निसर्गाने निर्मिलेले असून ते पंचमहा भूतापासून बनलेले आहे. जन्म आणि मृत्यू यांच्यामधला जो काही प्रवास आहे तो प्रवास सुखाचा वा आनंदाचा जावो या साठी माणूस झगडत असतो. दिनरात संघर्ष करत असतो. जीवनात सुख दुःख अडी अडचणी येत असतात. प्रत्येकाला वाटत असते की माझ्या वाटेला दुःख येऊच नये, फक्त सुखच यावे. हेच सुख मिळवण्यासाठी माणूस धडपड करत असतो. किंबहुना त्याचे वाटेला एखादा दुःख आले की तो त्या दुःखाला निवारण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो वेगळेगळे मार्ग शोधत असतो.
जेव्हा त्याला दुःख निवारण्याचा कोणताच मार्ग सापडत नाही. तेव्हा तो हतबल होतो आणि शेवटी एखाद्या कॅप्टन अशोक खरात सारख्या स्वयंघोषित भोंदूबाबाच्या जाळ्यात सापडतो. मग भोंदूबाबा स्वतः च मठ स्थापन करतो. गर्दी जमवतो, श्रध्दा अंधश्रद्धा चे प्रवचन देतो, मंत्र तंत्र देतो, आपलं चांगल होईल म्हणून आपण त्याला पैसे, दागिने, जमीन दान म्हणून फुकट देऊन टाकतो. तो त्याचा स्वतःचा फायदा करून घेतो. नाव, पैसा, जमीन जूमला कमावतो, अय्याशी करतो, वगैरे वगैरे…
माणूस हा समजुतदार प्राणी आहे. त्याला चांगल काय वाईट काय हे कळतं. ज्याच्याकडे स्वतः च्या जीवनात निर्णय घेण्याची क्षमता नसते. तो आयुष्यभर रडत असतो. या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, या बाबा कडे जा, त्या बाबा कडे जा, असं अंधश्रधा कर्मकांड करत बसतो. 5-5 तास मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभा राहतो. आणि ज्या वेळी देवाचे दर्शन घ्यायची वेळ येते तेव्हा देव्हाऱ्यातला पुजारी, सुरक्षा रक्षक त्याला धक्काबुकी करत देवळातून बाहेर काढत असतो. म्हणजे माणूस किती आशावादी आहे बघा. त्याला हे माहित असतं की दगडात देव नाही तरी तो त्याला हात जोडून पुजाऱ्याचा मार खाऊन दर्शन घेतोच! आणि शेवटी मनाची स्वतःच समजूत घालतो की झालं बाबा एकदाच दर्शन. आता देव पावला मला, माझ्या आयुष्यात आता दुःख येणार नाही, भरभराटच होणार आहे असे विचार करून तो पुढच्या प्रवासाला निघतो.
ज्या माणसाला जीवन जगण्याचा अर्थ कळला तो कधीच असं अंधश्रध्येचा बळी ठरत नसतो. त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता इतरांपेक्षा वेगळी असते. त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. जीवन जगत असताना तो नवनवीन कल्पकाचा शोध घेत असतो. तो अखंड प्रवास करत असतो. त्याच्याही वाटेला सुख दुःख असते. त्याच्यावर तो मार्ग काढत असतो. गौतम बुद्धाने ने देखील हेच सांगितले आहे की, दुःख म्हणजे तृष्णा, इच्छा, दुख निवारण्याचा त्यांनी अष्टांग मार्ग सांगितला आहे. चांगले विचार, आचार, दृष्टी, इत्यादी. त्याचा अनुकरण केलं तर आपलं जन्म आणि मृत्यू मधला प्रवास हा सुखकर होईल हे निश्चत आहे.
आता या भोंदूबाबा कडे जाणारे कोण ? ज्याचे जीवनात सतत दुःख आहे, ज्याला अपयश येत आहे, ज्याला आणखी-आणखी सुख पाहिजे असते. जो भितीला घाबरत किंवा ज्याला आपल्या जीवनात कायम सुखच मिळाव या वृतिचे लोक. ज्यांनी खरंच आध्यात्मिक ज्ञान आत्मसात केलेलं आहे असे साधू संत आपल्याला फार वर्षापूर्वी हेच सांगून गेलेत की, बाबांनो कर्मकांड करू नका, अंधश्रद्धा बाळगू नका, कोणालाही बळी देऊ नका, कर्म करत रहा, फल निश्चित आहे. जे रंजले गांजले, दीन दुबळे याची सेवा करा, झाडे लावा झाडे जगवा, पशु पक्षांना जगवा, त्यांना आपले मित्र बनवा. निसर्गात ईश्वराने निर्मिलेल्या गोष्टीचा आनंद घ्या. याच्यातूनच आपला जीवनातला खरा प्रवास सुखाचा होणार आहे.
आपण भोंदूबाबा कडे जाऊन आपल्या जीवनाचा खरा सार्थ ठरवू शकत नाही. आपण चांगले कर्म करत राहिलो, आपलं मन शुद्ध आचार विचाराने भरलेले असेल, एखाद्या गोष्टीचा राग, द्वेष, लोभ मनात नसेल, दुसऱ्याविषयी ममत्व, दयाभाव असेल, आणि आपल्या अंगी प्रामाणिकपणाचे गुण असेल तर आपल्याला कोणत्याही भोंदूबाबा कडे जायची गरज पडणार नाही. कॅप्टन अशोक खरात सारखे भोंदूबाबा आपल्या सुखी जीवनात काहीतरी दोष असल्याचा जाणीव निर्माण करून देतात आणि आपल्याला त्याचा शिकार बनवतात. आपल्याला हे कर ते कर, नाही केलं तर असं होईल तस होईल आणि खरं म्हणजे त्याच्या म्हणण्याने आपल्या जीवनात काहीच होत नसते. परंतु आपण एक आशेचा किरण घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या जीवनात सुख येईल भरभराट होईल या आशेने त्याच्याकडे वारी करीत बसतो.
खर पाहता अंधश्रधा आपल्या नसानसामधे भिनलेली आहे. उदाहरण द्यायचे झालेच तर एखाद्या घरात एखादया स्त्रीला मूलबाळ होत नाही, तिचं दुःख बरेच दिवस दूर होत नाही, म्हणून आपलेच घरातील लोक कुजबुज करत राहतात, समाजात तिला हीन वागणूक मिळत असते. बाहेरचं काहीतरी दोष असेल, कोणी करणी केलं असेल म्हणून असं घडतय हे विचार तिचे मनावर बिंबवतात. मग हे संकट दूर करण्यासाठी काय करावं लागेल? तर कॅप्टन अशोक खरात सारख्या स्वयंघोषित भोंदूबाबा कडे जावा लागेल अस तिला सांगितलं जाते.
त्या स्त्रीला देखील एक आशा असते की एक पर्याय म्हणून ती भोंदूबाबा कडे जाण्याचा निर्णय घेते. भोंदूबाबा तिला तंत्र मंत्र, यज्ञ कर्मकांड, उपवास करावं लागेल, माझ्याकडे दर सोमवार वारी करावं लागेल मग मूल होईल आणि नाही केलं तर मूल होणार नाही अस भोंदूबाबा सांगून मोकळा होतो. ती स्त्री भोंदूबाबा वर विश्वास ठेवते आणि इथंच ती फसते. दरम्यानच्या काळात भोंदूबाबा तिच्यावर लैंगिक अत्याचार करायला लागतो. नंतर तिला धमकी देतो, ब्लॅकमेल करतो. तेव्हा त्या स्त्रीचे डोळे उघडतात की आपल्याला तर मूल झालं नाही पण आपण या भोंदूबाबाचे बळी ठरलो. ज्या स्त्रीला तिच्यावर झालेले अत्याचार सहन होत नाही ती स्त्री अशा भोंदूबाबाच भांड फोडते. नाहीतर अशा कित्येक जणी बिचाऱ्या समाजात आपली नाचक्की होईल म्हणून याबाबत कुठेच वाचा न फोडता गप्प बसून राहतात.
मला या लेखाच्या माध्यमातून वाचकांना शेवटी एकच आव्हान करावंस वाटते, की आपण स्वतः च निर्णय स्वतः घ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, अंधश्रधेचे बळी ठरु नका. चांगले कर्म करा, चांगले फळ मिळवा. आनंदी आयुष्य घालवा. आयुष्यात सुख दुःख येणारच आहेत असे समजून पुढे चालत राहा. बाकी आपल्या आयुष्याचा प्रवास एक दिवस आपला मृत्यू होऊन थांबणारच आहे. हे सत्य आणि निश्चित आहे. त्यासाठी असे अंधश्रधा, कर्मकांड, थोतांड करायची काहीही गरज नाही.
बाळराजे पवार
पोलीस उप निरीक्षक
वाकोला पोलीस ठाणे मुंबई



