संतप्त पालकांनी इस्लापूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला ठोकले कुलूप

New Bharat Times नेटवर्क
ईस्लापूर : शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षकांच्या नियुक्ती करण्याबाबत अनेकवेळा विनंती केल्यानंतरही शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले नाही. संतापलेल्या पालकांनी ईस्लापुर येथील सावरकरनगर मधुल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आज दि. 27 ला सकाळी साडेदहाच्या सुमारास कुलूप ठोकत शिक्षण विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

गेल्या दोन महिन्यांपासून डेपुटेशनच्या नावाखाली किनवट गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कारभारात गोंधळ सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. यापूर्वी शालेय व्यवस्थापन समितीने २७ तारखेपर्यंत शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा देत थेट शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवले होते. मात्र, शिक्षण विभागाकडून यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर पालकांनी कठोर पाऊल उचलले.
यावेळी संतप्त पालकांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, “जोपर्यंत शाळेला कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त होत नाहीत किंवा पूर्वीचे तात्पुरते शिक्षक इरशाद पांडे यांची नियुक्ती केली जात नाही, तोपर्यंत शाळा सुरू होऊ देणार नाही. आवश्यक असल्यास संपूर्ण सत्रभर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवू.” दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अधिक वाढण्याची शक्यता असून शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्याचे होणारे नुकसान याची जिम्मेदार सर्वोत्तर शिक्षण विभागावर राहील असे ते म्हटले .



