भोपाळा गावाचा अभिमान! संदीप गंगाधर अंदेलवाड यांना ‘आदर्श तलाठी’ पुरस्काराने सन्मान

प्रा.डॉ.आशा तानाजी शेळगावकर
शंकर नगर :- नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील भोपाळा गावाचे सुपुत्र संदीप गंगाधर अंदेलवाड यांनी आपल्या कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्वाच्या जोरावर गावासह संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संदीप अंदेलवाड यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या संदीप यांचे प्राथमिक शिक्षण भोपाळा येथे, तर माध्यमिक शिक्षण नांदेड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात झाले. पुढील शिक्षण त्यांनी संभाजीनगर येथे पूर्ण केले.
सन २०१४ मध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची तलाठी म्हणून निवड झाली. भोपाळा गावाच्या इतिहासात तलाठी होण्याचा मान मिळवणारे ते पहिले युवक ठरले. नियुक्तीनंतर त्यांनी जालना जिल्ह्यातील महसूल विभागात २०१४ ते २०२६ या कालावधीत अत्यंत प्रामाणिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख सेवा बजावली.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांना ‘आदर्श तलाठी’ पुरस्काराने गौरविले. हा सन्मान केवळ संदीप अंदेलवाड यांचाच नसून भोपाळा गाव, नायगाव तालुका आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. “मातीतला माणूस, कर्तृत्वाने मोठा झालेला अधिकारी” अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, कष्ट, हुशारी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श म्हणून संदीप अंदेलवाड यांच्याकडे आज अनेक युवक प्रेरणास्थान म्हणून पाहत आहेत.



