ताज्या बातम्यानांदेडबिलोली

तीन वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर एस टी महामंडळ बिलोली आगाराचे आगार व्यवस्थापक नरसिंग निम्मनवाड यांची अहमदपूरकडे बदली मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप समारंभ कार्यक्रम

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बिलोली आगाराचे आगार व्यवस्थापक नरसिंग निम्मनवाड यांची अहमदपूर येथे बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आज (दि. ६ ऑगस्ट) बिलोली आगारात कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी बिलोली आगारातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सोमनाथ सोरडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागोराव पाटील रोशनगावकर, आगार लेखापाल राजेश चिलकेवार, भागवतराव शितळे, सेवानिवृत्त वाहतूक अधीक्षक शिवाजीराव येरडे, वाहतूक निरीक्षक पेटकर तसेच पत्रकार कुणाल पवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बिलोली आगाराच्या वतीने आगार व्यवस्थापक नरसिंग निम्मनवाड यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात निम्मनवाड यांच्या कार्यकाळातील विविध आठवणींना उजाळा देत त्यांच्या प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ कार्यपद्धतीचे कौतुक केले.

आगार व्यवस्थापक नरसिंग निम्मनवाड यांनी सुमारे पावणेतीन वर्षांपूर्वी बिलोली आगाराची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात बिलोली आगाराने उत्पन्नाच्या बाबतीत राज्यात अव्वल स्थान मिळविले, तर मराठवाडा विभागात स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामागे त्यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा मोठा वाटा असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. कर्मचाऱ्यांशी प्रेमळ व आपुलकीची वागणूक, त्यांच्या अडीअडचणी तत्परतेने सोडविण्याची भूमिका आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यशैली यामुळे निम्मनवाड हे बिलोली आगारातील कर्मचारी वर्गात अत्यंत लोकप्रिय आगार व्यवस्थापक म्हणून ओळखले जात होते.

त्यांच्या बदलीमुळे आयोजित निरोप समारंभात अनेक कर्मचारी भावूक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हणमंत पाटील यांनी केले. समारंभानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker