ताज्या बातम्यानांदेडनायगांव

कुंटूर तांडा येथील परिक्षा केंद्राला जिल्हाधिकांऱ्याची भेट

केंद्र संचालकाची तडकाफडकी उचलबांगडी तर गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीसा

अंकुशकमार देगावकर

नायगाव : तालुक्यातील कुंटूर तांडा येथील परिक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी दि. ७ मार्च रोजी भेट दिली असता अनागोंदी कारभारासह गैरप्रकार दिसून तर आलाच पण बैठे पथकातील काहीजण अनुपस्थित होते. जिल्हाधिकांच्या भेटीनंतर शिक्षण विभागाने तडकाफडकी केंद्र संचालकाची उचलबांगडी केली तर गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नायगाव तालुक्यात दहावी बारावीच्या परिक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले असून. यापुर्वी जनता हायस्कूल मधील केंद्र संचालक आनकाडे यांना निलंबित करण्यात आले तर शुक्रवारी कुंटूर तांडा येथील केंद्र संचालकाची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. शुक्रवारी गणिताचा पेपर असल्याने कुंटूर तांडा येथील परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी ११.३० वाजताच्या दरम्यान अचानक भेट दिली.

यावेळी परिक्षा केंद्रावर अनागोंदी कारभार तर दिसलाच पण परिक्षेत सुरु असलेला गैरप्रकार त्यांच्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र संचालकाला चांगलेच धारेवर धरले. त्याचबरोबर बैठे पथकाची चौकशी केली असता बैठे पथकातील मंडळ अधिकारी शितल स्वामी या गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.

जिल्हाधिकारी परिक्षा केंद्रातून बाहेर पडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करत केंद्र संचालक संभाजी रामशेटवाड यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली असून. त्यांच्या ठिकाणी गडगा येथील नाथोबा विद्यालयाचे मुख्याध्यापक भिमेश्वर दिगांबर पेठकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर बैठे पथकातील नियुक्त कर्मचारी, पोलीस व होमगार्ड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यात परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्रसंचालकांना सहकार्य करण्यासाठी आपली नियुक्ती सदर केंद्रावर केलेली होती. परंतु आपण असे काम न केल्यामुळे सदर केंद्रावर मोठ्या प्रमाणावर जमाव दिसून आला. यावरून आपण आपणास नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट होते.

यामुळे आपणास सदर नोटीस देऊन विचारणा करण्यात येते की, आपण आपणास नेमून दिलेल्या कामात कसूर का केली व मंडळाच्या कामकाजात हलगर्जीपणा का केला, याबाबत आपला स्वयंस्पष्ट खुलासा या कार्यालयास सादर करावा असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान कुंटूर तांडा येथील परिक्षा केंद्रावर जमाव दिसून आला त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker