कोकलेगाव येथील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावरील धाड संशयाच्या भोवऱ्यात : आकरा जुगाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद
भितीपोटी कुंटूर पोलिसांनी पथक येण्याच्या अगोदर मारली धाड...

प्रकाश माहिपाळे
नायगाव : तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे कोकलेगाव गावा शेजारील शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर कुंटूर पोलिसांनी दि. 28 रोजी धाड मारुन 11 जुगार खेळणाऱ्यावर गुन्हे दाखल केले. परंतु या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावरील कारवाईत 14 हजाराची रक्कम जप्त करण्यात आल्याने ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे केलेल्या कारवाईची माहिती दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र कुंटूर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचनेला केराची टोपली दाखवून कोकलेगाव परिसरात जुगार अड्डा चालवण्याची मुक समंती दिली होती. परंतु काल दि.28 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नायगाव तालुक्यातील जुगार अड्ड्यावर कारवाई करणार असल्याचा सुगावा कुंटूर पोलिसांना लागला. पथकाने कारवाई केल्यास प्रकरण अंगलट येईल या भितीपोटी कुंटूर पोलिसांनी पथक येण्याच्या अगोदर धाड मारली.
या कारवाईत नारायण बालाजी कदम, हनुमंत पांडुरंग मिरकुटे, संतोष किशन पालनवार, गोविंद यशवंत सोळुंके, अनिल आनंदराव शिंदे, सुनील उत्तम हनुमंते, साहेबराव सटवा पदीलवाड, साईराज रामकिशन कदम, सचिन पांडूरंग शेळगावे, चंद्रकांत मारुती हळदेवाड, श्याम वसंत खदके असे एकूण 11 आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे.
विशेष म्हणजे या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली त्यावेळी मोटारसायकलीसह चारचाकी कार आणि सर्वच जुगाऱ्यांकडे मोबाईल होते. मात्र 13 हजार 990 एवढीच रक्कम जप्त केल्याची नोंद घेण्यात आली.
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळेगाव, राहेर सुजलेगाव, सालेगावसह अनेक ठिकाणी जुगार अडे चालत आहेत अशी आता चर्चा सुरु झाली असून मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्रीही सुरु असल्याचा आरोप होत आहे.