ताज्या बातम्यानांदेडबिलोली

बिलोली तालुक्यात बोगस पत्रकाराचा सुळसुळाट ; वाळूचे प्रश्न घेऊन तहसील कार्यालयात गर्दी…

New Bharat Times नेटवर्क

बिलोली :- नांदेड जिल्हा बिलोली तालुक्यात वाळूच्या पार्श्वभूमीवर नायगांव, देगलूर, धर्माबाद, उमरी,नांदेड येथील बोगस पत्रकारचा बिलोलीत सुळसुळाट, विविध पेपर व सोशलमीडियाच्या नावाचा वापर करून सरळ रेतीघाट किंवा तहसील कार्यालयात येऊन कर्मचारी व अधिकाऱ्यावर दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत आहेत. यामुळे तालुक्यातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी हाल होताना दिसून येते.

तालुक्यात वाळू घाटाच्या पार्श्वभूमीवर बोगस आणि नामधारी पत्रकारांचा सुळसुळाट वाढत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवशे, नवशे आणि गवशे या “पत्रकार” वर्गाने विविध भागांत सक्रिय उपस्थिती दाखवत प्रामाणिक पत्रकारांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला असल्याची तक्रार स्थानिक पत्रकार संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

काही व्यक्ती स्थानिक वृत्तपत्रांसारखी नावे वापरून किंवा युट्यूब व फेसबुकवरील स्वतःच्या पेजद्वारे बातम्या प्रसारित करत आहेत. जुनी अथवा इतर माध्यमांतील बातम्या कॉपी करून “लाईव्ह” स्वरूपात प्रसारित करणे आणि विविध ग्रुपवर शेअर करणे, अशी सर्रास पद्धत सुरू आहे. यामुळे लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवरील विश्वास डळमळीत होत चालल्याचा इशारा पत्रकार संघटनांनी दिला आहे.

आर.एन.आय. नोंदणी न करता आणि कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता हे स्वयंघोषित संपादक व रिपोर्टर कार्यरत झाले आहेत. या बनावट पत्रकारांनी पत्रकार परिषद, सभा व मेळावे याठिकाणी मोबाईल शूटिंग करून पैसे उकळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पत्रकारितेशी संबंधित कोणतीही शैक्षणिक पात्रता, शासनमान्य कोर्स किंवा नोंदणी नसतानाही ‘संपादक’ अथवा ‘प्रमुख प्रतिनिधी’ अशी पदव्या धारण करून सोशल मीडियावर वावरणारे हे स्वयंघोषित पत्रकार होत आहेत.

विशेषतः तालुक्यात नैसर्गिक आपत्ती व शेतकऱ्यांच्या अतोनात अडचणी वेळी हे पत्रकार कधी दिसत नाहीत पण वाळू किंवा मुरूम व्यवसाय सुरु होताच नायगांव, देगलूर, धर्माबाद, नांदेड येथील बोगस पत्रकार बिलोली तालुक्यात शिरकाव करून पत्रकार असल्याचे सांगून वाळू, मुरूम व्यावसायिकावर दबाव टाकून पैसे उखळणे, पैसे नाही दिल्यास चार- पाच लोकांची झुंड घेऊन कार्यालयात जाऊन कर्मचारी व अधिकाऱ्यास वाळू विषयी प्रश्न विचारू वारंवार कामात अडथळा निर्माण करणे.

काम होत नसेलतर बातमी छापण्याची धमकी देणे, हा असा प्रकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे, कार्यालयात या नेहमीच्या गर्दीमुळे तालुक्यातील नागरिकांची कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. अशा व्यक्ती पत्रकारांच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधत असल्याने खऱ्या पत्रकारितेच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डिजिटल युगात माहितीचा झपाट्याने प्रसार होत असला, तरी नियंत्रण यंत्रणेअभावी बोगस पत्रकारांचा प्रभाव वाढत आहे.

तालुक्यातील पत्रकारितेतील दिशाभूल, फसवणूक आणि गोंधळ थांबवण्यासाठी शासनाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी समाजमाध्यमांतून जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker