बिजूर शिवारातील बार फोडण्याचा प्रयत्न : चोरटे सीसीटीव्हीत कैद ; परिसरात भीतीचे वातावरण

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिजूर शिवारात असलेल्या कार्तिकी बारमध्ये मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, कॅमेरात कैद झालेल्या चोरट्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. हा प्रकार केवळ दारू चोरी करण्यासाठी करण्यात आला होता की रामतीर्थ पोलिसांना खुले आव्हान देण्याचा प्रयत्न होता, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

नांदेड–देगलूर राज्य महामार्गालगत असलेल्या बिजूर येथील कार्तिकी बारवर मध्यरात्री चार अज्ञात व्यक्तींनी बार फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. संबंधित व्यक्ती बारचे दरवाजे लाथांनी तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे तसेच खिडक्यांमधून आत डोकावून पाहत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. काहींच्या हातात शस्त्रासारखी वस्तू असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे महामार्गालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त अपुरी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. “चोरटे एवढ्या निर्भयपणे बार फोडण्याचा प्रयत्न करत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?” असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.
विशेष म्हणजे, हा प्रकार रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला असला तरी चोरट्यांची हिंमत वाढल्याचे चित्र दिसत असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांचा तातडीने शोध घ्यावा आणि नागरिकांमध्ये सुरक्षा भावना निर्माण करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
आता या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचता येणार का, की चोरटे पोलिसांना खुले आव्हान देत फरार होणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



