ताज्या बातम्यानांदेडबिलोली

चिरली-टाकळी (थडी) गटग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाची बोअर मोटर सरपंचाच्या खाजगी बोअरमध्ये ; महिनाभरापासून संपूर्ण गाव तहानलेले!

◆ग्रामस्थांनी जाब विचारताच सरपंचाचे पती असलेल्या पोलीस पाटलाची दादागिरी ; 'तुला बघून घेतो' म्हणत दिली धमकी ◆ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सह बीडीओ कुंडलवाडी पोलीस स्टेशन मध्ये ग्रामस्थांनी दिली तक्रार

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- शासनाने जनतेला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून लाखो रुपयांचा निधी दिला, पण बिलोली तालुक्यातील मौजे टाकळी थडी येथे सत्तेचा आणि पदाचा अत्यंत लाजीरवाणा गैरवापर उघडकीस आला आहे. गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी संगनमत करून चक्क १५ व्या वित्त आयोगातून खरेदी केलेली शासकीय विंधन विहीर (बोअर) मोटर स्वतःच्या खाजगी वापरासाठी पळवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या स्वार्थी आणि बेकायदेशीर कृत्यामुळे गत महिनाभरापासून संपूर्ण टाकळी( थडी) गाव पाण्यासाठी वणवण भटकत असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.या भ्रष्ट कारभाराविरोधात साहेबराव कांबळे यांच्यासह नागरिकांनी थेट बिलोलीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेत पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे.

टाकळी थडी गावाचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी शासनाने अधिकृत मोटर मंजूर केली होती. मात्र, सरपंचांनी गावाला पाणी देण्याऐवजी ती मोटर स्वतःच्या खाजगी बोअरमध्ये टाकून स्वतःचे घर सुजलाम् सुफलाम् करण्याचा घाट घातला. विशेष म्हणजे, या गंभीर गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसेवक आणि विस्तार अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, या अधिकाऱ्यांनीही सरपंचाची पाठराखण करत ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे या भ्रष्टाचारात प्रशासनाचे अधिकारीही सामील आहेत का? असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दिनांक ८ जुलै २०२६ रोजी सरपंचांचे सासरे आणि पोलीस पाटलांचे वडील बेकायदेशीरपणे पाईप जोडत असताना, सजग ग्रामस्थांनी त्यांना हटकले. शासकीय मोटर खाजगीत का वापरता, असा साधा प्रश्न विचारताच
ग्रामस्थांना अरेरावी ची भाषा केली. तसेच पोलीस पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून साहेबराव कांबळे यांना “तू कोण विचारणारा? मी गावचा पोलीस पाटील आहे, तुला बघून घेतो,” अशा थेट गुंडशाहीच्या भाषेत धमकावण्यात आले. जनतेचे रक्षण करायचे सोडून पोलीस पाटील गावात दमदाटी करत असल्याने महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ऐन पावसाळ्यात गावाला कृत्रिम पाणीटंचाईच्या खाईत लोटणाऱ्या या भ्रष्ट कारभाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन या तक्रारीच्या प्रतिलिपी थेट नांदेडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , उपविभागीय अधिकारी आणि कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांना पाठवण्यात आल्या आहेत. आता जिल्हा प्रशासन या मुजोर सरपंच आणि पोलीस पाटलावर कायदेशीर बडगा कधी उगारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker