कुंडलवाडीच्या सुरेश राचोटींचा मृत्यू की हत्या? ◆ नातेवाईकांचा थेट घातपाताचा आरोप

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- येथील रहिवासी सुरेश सायन्ना राचोटी (वय ३९) यांचा मृतदेह ८ मे २०२६ रोजी जारीकोट शिवारात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने, हा मृत्यू नसून घातपात आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मयत सुरेशचे भाऊ राम सायन्ना राचोटी यांनी दि.११ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार जानेवारी २०२५ मध्ये सुरेश राचोटी यांना त्यांचे मावस मेहुणे हाणमलू गंगाधर शेट्टीवार आणि कार चालक साईनाथ उजलपा कुंकनूर हे दोघे पैसे देण्याच्या बहाण्याने बोधन येथे घेऊन गेले होते. त्यानंतर सुरेश यांनी घरी परतल्यावर आपल्या जिवाला धोका असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. यावर नातेवाईकांनी बैठक घेऊन वाद मिटवला होता.
दरम्यान, ३० एप्रिल २०२६ रोजी सुरेश यांच्या पत्नी कविता या बोधन येथील आपल्या माहेरी गेल्या होत्या. त्यानंतर २ मे २०२६ रोजी सुरेश हे आपल्या पत्नीला आणण्यासाठी बोधन येथे गेले. त्याच रात्री साडेनऊ वाजल्यापासून त्यांचा मोबाईल बंद झाला. नातेवाईकांनी शोध घेतला असता, ८ मे २०२६ रोजी सकाळी सुरेश राचोटी यांचा मृतदेह जारीकोट शिवारातील शेतात संशयास्पद स्थितीत आढळून आला. धर्माबाद पोलिसांकडून याबाबत मयत सुरेशच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली हा प्रकार घातपाताचा असावा, असा संशय मयत सुरेशच्या कुटुंबियांनी केला आहे.
शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत संशयित आरोपी हाणमलू गंगाधर शेट्टीवार आणि कार चालक साईनाथ उजलपा कुंकनूर यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासून तांत्रिक तपास करून दोषीवर कारवाई करावी. तसेच धर्माबाद पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास गतीने व्हावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मयताचे भाऊ अर्जदार राम राचोटी यांनी केली आहे. निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद यांना सुद्धा देण्यात आले आहे.
या निवेदनामुळे सुरेश रायोटी यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पोलीस प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि तपासाला कोणती दिशा मिळते, याकडे कुंडलवाडीसह संपूर्ण बिलोली तालुक्याचे लक्ष लागले आहे.



