छत्रपती शिवाजी महाराज : विचारधारा आणि व्यवस्थापन विषयात एम.ए.पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी

New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात “छत्रपती शिवाजी महाराज : विचारधारा आणि व्यवस्थापन” हा एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, राष्ट्रनीती, लोककल्याणकारी प्रशासन, नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन तत्त्वांचा शैक्षणिक स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास पोहोचावा, या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. लक्ष्यवेध फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल मोरे आणि उपाध्यक्ष निवृत्त शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी तसे निवेदन कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांना दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही प्रशासन, न्यायव्यवस्था, राष्ट्रनिष्ठा, लोककल्याण आणि दूरदृष्टी यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याचा अभ्यास विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, व्यवस्थापन कौशल्य, निर्णयक्षमता, शिस्त, नैतिक मूल्ये, संघटन कौशल्य, संकट व्यवस्थापन आणि राष्ट्रप्रेम विकसित करण्यास उपयुक्त ठरेल.
तसेच, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत भारतीय ज्ञानपरंपरा, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि भारतीय इतिहासाला विशेष महत्त्व देण्यात आले असून, प्रस्तावित अभ्यासक्रम त्या उद्दिष्टांना पूरक ठरणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आजच्या काळात युवकांना व्यसनमुक्त, चारित्र्यसंपन्न, कर्तव्यदक्ष, समाजाभिमुख आणि सक्षम नेतृत्व म्हणून घडविण्यासाठी शिवचरित्राचा शैक्षणिक अभ्यास आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हा अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू असून विद्यार्थ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही हा अभ्यासक्रम सुरू केल्यास मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैचारिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने या अभ्यासक्रमास मान्यता देऊन तो लवकरात लवकर सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली आहे.



