”जनतेच्या जीविताशी खेळणाऱ्यांना माफी नाही” ; विष्णुपुरी येथे उद्या वंचितचे तीव्र आंदोलन
विष्णुपुरी 'काम बंद आंदोलनात' मोठ्या संख्येने सहभागी व्हा : दिपक गजभारे यांचे आवाहन

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ व दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेड दक्षिण महानगर यांच्या वतीने बुधवार, दि. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता एस.जी.जी.एस. महाविद्यालयासमोर, विष्णुपुरी (ता.जि.नांदेड ) येथे “काम बंद आंदोलन” आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित घटनेची उच्चस्तरीय व स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पुलावरील व महामार्गावरील सुरू असलेली कामे तात्काळ स्थगित करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशीही मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये विष्णुपुरी पुल दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी, संबंधित कंत्राटदार कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, पुलाच्या सुरक्षिततेचा तांत्रिक अहवाल सार्वजनिक करणे तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे या मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनास वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सदस्य अक्षय (भाऊ) बनसोडे, नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, जिल्हा महासचिव ॲड.वैभव लष्करे, महानगराध्यक्ष सुखासिंग टाक तसेच महानगर महासचिव शुद्धोधन कापशीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनतेच्या हक्काच्या या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन दिपक माधवराव गजभारे (घुंगराळा), जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेड (दक्षिण) यांनी केले आहे.
यावेळी दिपक गजभारे म्हणाले की, “जनतेच्या जीविताच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. सार्वजनिक कामांतील निष्काळजीपणा व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित होऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे.”



