घराणेशाही जिंदाबाद! जिल्हा बँकेवर पुन्हा राजकीय घराण्यांचाच कब्जा; ११ जागा बिनविरोध, जिल्हा बँक बनली राजकीय पुनर्वसन केंद्र

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कटू वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे. शेतकरी आणि सामान्य सभासदांच्या हक्काची समजली जाणारी जिल्हा बँक आता काही मोजक्या राजकीय घराण्यांची “खासगी जहागीर” बनल्याची टीका होत आहे. तब्बल २३ पैकी ११ जागा बिनविरोध निवडून आणत बड्या नेत्यांनी आपल्या पत्नी, मुला-मुली आणि नातेवाईकांचे राजकीय पुनर्वसन केल्याने “घराणेशाही जिंदाबाद” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन वर्षानुवर्षे राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या वाट्याला मात्र पुन्हा एकदा निराशाच आली आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणात रक्ताच्या नात्यांना प्राधान्य आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान, हेच या निवडणुकीत अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जिल्हा बँक की राजकीय पुनर्वसन केंद्र?
एकेकाळी शेतकऱ्यांची आर्थिक आधारवड म्हणून ओळख असलेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता राजकीय वारसदारांना पुढे आणण्याचे व्यासपीठ बनल्याचा आरोप होत आहे. अनेक नेत्यांनी या बँकेच्या माध्यमातून स्वतःचे राजकारण फुलवले आणि आता त्याच बँकेच्या माध्यमातून आपल्या वारसांचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. बँकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाली, कोट्यवधींची थकबाकी वाढली, अनेक संस्था अवसायनात गेल्या; पण बँकेला या अवस्थेत आणणारे अनेक नेते आजही त्याच बँकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे लोकशाहीची अक्षरशः थट्टा सुरू असल्याची भावना सभासदांत व्यक्त होत आहे.
राजकीय वैर विसरले, पण कार्यकर्त्यांना विसरले!
जिल्हा बँकेची निवडणूक सुरू होताच राजकीय समीकरणे वेगाने बदलली. एकमेकांचे तोंडही न पाहणारे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नातेवाईक आणि वारसांचे राजकारण “सेट” करण्यासाठी तडजोडी करण्यात आल्याची चर्चा आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र सर्व प्रयत्नांनंतरही २३ पैकी फक्त ११ जागाच बिनविरोध निवडून आल्या.
बिनविरोध निवडून आलेले दिग्गज कंधार – आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे-चिखलीकर, लोहा –आ.प्रताप पाटील चिखलीकर, नायगाव –खा.रविंद्र चव्हाण यांचे चुलते श्रीनिवास पाटील चव्हाण, मुखेड – आ.तुषार राठोड, किनवट – आ.भिमराव केराम, उमरी – मारोतराव कवळे, बिलोली – माजी खासदार भास्कराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा मिनल खतगावकर, महिला गट – माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर यांच्या पत्नी सुशिलाताई बेटमोगरेकर
महिला गट – आ.राजेश पवार यांच्या पत्नी पूनम राजेश पवार
ब गट –शिवराम लूटे व क गट – दिवंगत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव कैलास देशमुख गोरठेकर
चर्चित चेहरे बिनविरोध, बाकीच्या जागांवर अनोळखी लढत
विशेष म्हणजे बिनविरोध झालेल्या जागांवर सर्वच दिग्गज आणि राजकीय घराण्यांचे प्रतिनिधी निवडून आले आहेत.
तर उर्वरित १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत एकाही मोठ्या किंवा चर्चित चेहऱ्याचा समावेश नाही. यामुळे “मोठ्यांनी आपले राजकारण सुरक्षित केले आणि सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात ढकलले,” अशी टीका होत आहे.
सामान्य कार्यकर्त्यांचा सवाल…
“जिल्हा बँक शेतकऱ्यांची की काही घराण्यांची? निष्ठावान कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या आणि सत्तेची फळे मात्र नेत्यांच्या नातेवाईकांनीच चाखायची का?” असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. नांदेड जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ संचालक निवडीची नसून, सहकारावर घराणेशाहीने मिळवलेल्या वर्चस्वाची आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या राजकीय उपेक्षेची जिवंत साक्ष ठरत असल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे.
या जागेसाठी होणार निवडणूक
विमुक्त जाती भटक्या जमाती
ज्ञानेश्वर दहिफळे/ उकंडराव जाधव, ओबीसी
अनिल पाटील बाभळीकर/ ज्ञानेश्वर राजेगोरे , एसी एसटी
रामचंद्र मुसळे/ विजय सोनवणे/ प्रतिभा एर्डावार, हदगाव
चंद्रशेखर कदम/ कृष्णा पाटील आष्टीकर, हिमायतनगर
माधवराव पाटील जवळगावकर/ विशाल राठोड, देगलूर
विजयसिंह देशमुख/ स्वेता पाटील, धर्माबाद दत्तात्रय रेड्डी, गोविंद जाधव, नांदेड. अतूल वाघ/ संगिता पाटील डक, भोकर
राजू जाधव/ माधव कदम, माहूर
राजेंद्र केशवे/ ज्योतीबा खराटे व मुदखेड
मारोती जाधव/ मारोतराव पाटील.



